आरक्षणांच्या आंदोलनांमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवायचे असतील तर सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणना झालीच पाहिजे!: प्रा डॉ देवकुमार अहिरे
पुणे, ०२/१२/२०२३: ‘सामाजिक आरक्षणाचे राजकारण’ या ३० नोव्हेंबर रोजी पुरुष उवाच आयोजित चर्चेत मा. प्रवीणदादा गायकवाड आणि डॉ. देवकुमार अहिरे यांनी सामाजिक आरक्षणाच्या विविध पैलूंविषयी मांडणी केली.
संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी १९८० दशकापासून ते आतापर्यंत मराठा आरक्षणाची मांडणी ही आर्थिक आरक्षणापासून ते ओबीसी आरक्षणापर्यंत कशी बदलत गेली हे सांगितले. तसेच, शासन दिवसेंदिवस खाजगीकरणाला प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे सरकारी नोकऱ्या मुळात कमी झालेल्या आहेत. त्यामुळे आरक्षणामुळे मूळ सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत म्हणून शासनाने स्वस्तात सगळ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. शेतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शेती उत्पन्न हे पुरेसे नाही. मराठा समाजाला न्याय देण्याचे विविध मार्ग आहेत. तसेच जागतिकीकरणाने निर्माण झालेल्या व्यापक आर्थिक संधी चा विचार मराठा नव्हे सर्वच मराठी समाजाने करायचा हवा असे सांगितले.
ज्या जातींची संख्या मोठी आहे त्या जाती आपल्या मागण्यांसाठी संख्येच्या बळावर सामाजिक कोंडी करू शकतात म्हणून सरकार त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देते मात्र समाजात अशा अनेक जाती आहेत कि, ज्यांची संख्या खूपच कमी आहे. जे चक्काजाम करू शकत नाहीत. सामाजिक कोंडी करू शकत नाहीत म्हणून त्यांच्या प्रश्नांकडे सरकार मात्र दुर्लक्ष करते. मराठा, ओबीसी, धनगर यांनी ज्याप्रमाणे आरक्षणाच्या संदर्भात आंदोलने चालवली आहेत तशीच आंदोलने आजघडीला अनेक छोट्या जातींनी चालवल्या आहेत मात्र त्यांना प्रसिद्धी मिळत नाही अशी भूमिका डॉ. देवकुमार अहिरे यांनी मांडली. तसेच आरक्षणाविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे समाजात सम्यक चर्चा होत नाही. उथळ आणि काळ्या-पांढऱ्या चौकटीतच त्याकडे पाहिले जाते म्हणून सामाजिक आरोग्य बिघडत आहेत असेही ते म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले कि, देशभरात आणि महाराष्ट्रात विविध जाती एकीकडे आरक्षणाची मागणी करत आहेत आणि दुसरीकडे आरक्षणांतर्गत वर्गीकरणाची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे आरक्षणाची पुनर्रचना करण्याची अत्यंत गरज आहे पण त्यासाठी आधी सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणना करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याशिवाय आपणास आपली नेमकी सामाजिक, आर्थिक आणि जातीय स्थिती नेमकी काय आहे हे कळणार नाही.
‘ वर्तमानातील गुंतागुंतीचे विषय समजुन घेण्यासाठी, आरक्षण विषयावर सखोल चर्चेसाठी अभ्यास वर्गात हा विषय घेतल्याचे सुरवातीला मुकुंद किर्दत यांनी सांगीतले. डॉ गीताली वि मं यांनी शेवटी आभार मानले.