राजीनाम्यासाठी शरद पवारांनीच आंदोलन करायला लावले – अजित पवारांचा गोप्यस्फोट
खालापूर, १ डिसेंबर २०२३ : शरद पवारांच्या आदेशानेच राजीनामा परत घेण्याचं आंदोलन करण्यात आलं असल्याचा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, कर्जमध्ये अजित पवार गटाचं विचार मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी राष्ट्रवादीची फुट ते शरद पवारांचा राजीनाम्यावर सडेतोडपणे भाष्य करीत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
मोदी, राहुल गांधींनाही ओबीसी समाजाचं महत्त्व पटलं; अजितदादांनासमोर भुजबळांनी ठासून मांडला मुद्दा
अजित पवार म्हणाले, शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली होती. शरद पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच झाला होता. १ मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं आता सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही माहिती नाही. घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं. ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. तिथे वातावरण बदललं. ते घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला व युवक पाहिजेत, त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या. मला हे कळलंच नाही की का? राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं. मग हे रोज जाऊन आंदोलनाला बसायचे. ठराविकच टाळकी होती तिथे. जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता तिथे. आम्हालाही कळेना. मला एक सांगतायत, तिथे एक सांगत असल्याचा खळबळजनक दावा अजित पवारांनी केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांत सध्या चांगलीच धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाकडून कर्जमधील खोपोलीत विचार मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून अजित पवार गटाचे नेते, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार नेमकी काय? भूमिका स्पष्ट करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.