पुढील ५० वर्षे हा देशाचा अमृतकाळ: डॉ. एस. जयशंकर
पुणे: २५/११/२०२३: – भारताला स्वतःचे असे एक कथानक असणे आवश्यक आहे. “ग्लोबल साउथ” हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता भारत हा “ग्लोबल साऊथ” चा चेहरा झाला आहे. हा शब्द आधी कुठेही वापरला जात नव्हतामापन आता तो भारताला उद्देशून वापरला जातो आहे. आपल्याला आपल्या कथनांबद्दल स्वतःला पटवून द्यावे लागेल, त्याचा सराव करावा लागेल आणि नंतर लोकप्रिय करावे लागेल. यावर काम करण्यासाठी आणि ते यशस्वी करण्यासाठी एका मजबूत यंत्रणेची गरज आहे, असे भारत सरकारचे माननीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले.
डॉ. एस. जयशंकर, माननीय परराष्ट्र व्यवहार मंत्री, भारत सरकार यांना सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) तर्फे आयोजित “आंतरराष्ट्रीय संबंध परिषदेच्या उदघाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय संबंध परिषदेचे आयोजन दिनांक २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे, पुणे येथील कॅम्पस मध्ये करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना डॉ. एस. जयशंकर म्हणाले, इतर देशांतील लोक जागतिक बाजारपेठेबद्दल बोलतात परंतु आपण जागतिक कार्यस्थळाबद्दल बोलतो. भारतीयांसाठी राष्ट्रीयीकरण आणि आंतरराष्ट्रीयीकरण या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत कारण “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेवर आपला विश्वास आहे
भारताच्या परराष्ट्र धोरणांविषयी बोलताना डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, आपण यापूर्वी न स्वीकारलेले वेगवेगळे मार्ग स्वीकारले पाहिजेत. भूतकाळात पर्याय आणि विचार प्रक्रिया अस्तित्वात होती पण आता आपण आपल्या स्वतःच्या नोंदींचे गंभीरपणे परीक्षण करणे आवश्यक आहे. अनेकविध संकल्पना आपल्या संस्कृतीत आहेत पण आपण त्याकडे वेगळ्या पदुष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे.
अलीकडील भारतीय उपक्रमांबद्दल बोलताना त्यांनी “जागतिक योग दिन”, मिलेट्स (बाजरी, नाचणी इत्यादी ) चा आहारातील समावेश तसेच वसुधैव कुटुंबकम सारख्या शब्दावली वापरणे याचा उल्लेख केला. ते म्हणले कि, जी 20 देशांच्या मनात आता हे ठसले आहे की भारत जगाला एक कुटुंब मानतो.
मुत्सद्द्यांबद्दल बोलताना ते म्हणाले, भगवान हनुमान आणि भगवान श्री कृष्ण हे पूर्वी महान मुत्सद्दी होते, तर अलीकडच्या काळात आपल्याकडे स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर होते ज्यांनी या राष्ट्राचे मुत्सद्दी म्हणून काम केले.
पुढील ५० वर्षातील जग हे आपण गेल्या ५० वर्षात पाहिलेल्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल आणि हीच पुढील ५० वर्षे हा भारताचा “अमृतकाळ” असेल.
डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते डॉ.विद्या येरवडेकर, प्र कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांनी प्रास्ताविक केले, डॉ. रामकृष्णन रमण कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, यांनी आभार प्रदर्शन केले व प्रा. शिवाली लवळे, संचालक, सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनं केले.