माजी जिल्हा न्यायाधीश रवींद्र पद्माकरराव देशपांडे महारेराचे नवीन न्यायिक सदस्य म्हणून रूजू

मुंबई, २२/११/२०२३: भूम,उस्मानाबादचे माजी जिल्हा न्यायाधीश आणि महारेराचे नवनियुक्त न्यायिक सदस्य श्री. रवींद्र पद्माकरराव देशपांडे यांना महारेराचे अध्यक्ष श्री.अजोय मेहता यांनी नुकतीच पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर त्यांनी नवीन पदाचा पदभार स्वीकारला.याप्रसंगी महारेराचे सदस्य श्री. महेश पाठक, सचिव डाॅ. वसंत प्रभू , वरिष्ठ अधिकारी सर्वश्री मोहन राव, वसंत वाणी इत्यादी हजर होते.

महाराष्ट्र शासनाने एका शासन निर्णयाद्वारे श्री. देशपांडे यांची महारेराच्या न्यायिक सदस्यपदी नियुक्ती केलेली आहे.

मराठवाड्याच्या अंबाजोगाई येथील रहिवाशी श्री.देशपांडे यांनी अंबाजोगाई येथून बी. काॅमची पदवी संपादन केली आणि छ.संभाजीनगर येथून एलएलबी . 1995 मध्ये उस्मानाबाद येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर यवतमाळला मुख्य न्यायदंडाधिकारी, मुंबईच्या लघुवाद न्यायालयात अतिरिक्त मुख्य न्यायाधीश आणि भूम, उस्मानाबाद येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश- 2 म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले. तेथूनच ते गेल्यावर्षी मार्चमध्ये सेवानिवृत्त झाले.