पुणे: रात्रीच्या वेळी होणाऱ्या बांधकामाविरुद्ध कारवाई करावी – रोहन सुरवसे-पाटील

पुणे, ०८/११/२०२३: शहर आणि महानगर पालिका हद्दीत रात्रीच्या वेळी चालणाऱ्या बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाळू, क्रशर डम्परमधून खाली करताना होणारा आवाज, बांधकाम सुरु असताना कामगारांचा आवाज, मिक्सरचा आवाज यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री होणारी बांधकामे थांबवण्यात यावीत, तसेच महापालिकेचे आदेश न जुमानणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.

“बांधकाम व्यावसायिकांना बांधकामाची परवानगी देताना रात्री-अपरात्री बांधकाम करण्यात येऊ नये, याबाबत महापालिकेकडून परवानगी पत्रावर कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसल्याचे आढळून येते. याचाच गैरफायदा बांधकाम व्यावसायिक घेतात. याबाबत जाब विचारायला गेल्यास अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना दमदाटीही केली जाते. पोलिसांकडे तक्रार करायला गेल्यास पोलीस देखील याची दखल घेत नाहीत, असे दिसून येते. त्यामुळे महापालिकेने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे,” असे सुरवसे-पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

“रात्री-अपरात्री चालणाऱ्या बांधकामावेळी निर्माणाधीन इमारत कोसळणे, स्लॅब कोसळणे तसेच इतर दुर्घटना अनेकदा घडल्या आहेत. यात अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी चालणाऱ्या बांधकामाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याबाबत नागरिक बांधकाम व्यावसायिकांना जाब विचारायला गेले असता त्यांच्यावर दमदाटी करण्यात येते. त्यामुळे महापालिकेने रात्री अपरात्री होणाऱ्या बांधकामाविरुद्ध कडक कारवाई करावी,” असेही त्यांनी नमूद केले आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप