पश्चिम महाराष्ट्रात महावितरणचा वीजचोरांना दणका, एकाच दिवशी ८३ लाखांचा अनधिकृत वीजवापर उघड

पुणे, दि. ०८ नोव्हेंबर २०२३: पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत १२५१ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या ९९३ वीजचोऱ्यांचा समावेश आहे. नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. तर कलम १२६ प्रमाणे अनधिकृत वीजवापराचे २५८ प्रकार आढळून आले आहेत.

वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध परिमंडल अंतर्गत नियमित कारवाई सुरु आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रात एकाच दिवशी धडक मोहीम राबविण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी दिले. त्यानुसार पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि. ४) वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रादेशिक संचालक श्री. नाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

पुणे प्रादेशिक विभागातील एकदिवसीय विशेष मोहिमेत १२५१ ठिकाणी ८२ लाख ४२ हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघड झाला आहे. यामध्ये (कंसात रक्कम) पुणे जिल्हा- ५७८ (४६.१५ लाख), सातारा- ९२ (७.३४ लाख), सोलापूर- २७४ (१३.३८ लाख), कोल्हापूर- ९८ (६.७५ लाख) आणि सांगली जिल्ह्यामध्ये २०९ ठिकाणी ८ लाख ८० हजार रुपयांचा अनधिकृत वीजवापर उघड झाला आहे. वीजचोरीविरुद्ध नियमितपणे सुरु असलेली मोहीम आणखी वेगवान करण्याचे प्रादेशिक संचालक श्री. नाळे यांनी दिले आहेत.

वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरी केल्यास विद्युत अपघाताचा मोठा धोका असतो. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन सुरक्षित वीजपुरवठा घ्यावा व फौजदारी कारवाई व कारावासाची शिक्षा टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप