बच्चू कडू यांचा सरकारला पुन्हा घरचा आहेर – मराठ्यांना आरक्षणाचा अधिकार नाही का ?

बुलढाणा, २ नोव्हेंबर २०२३: मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागण्यासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. पण, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास राज्य सरकार अनुकूल दिसत नाही. यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारला खडसावलं आहे.
बच्चू कडू बुलढाण्यात बोलत होते. “मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील आहेत? मराठ्यांचा आरक्षणावर अधिकार नाही का?” अशा प्रश्नांची सरबत्ती बच्चू कडूंनी सरकारला केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, “देशात ओबीसींचा वाटा जास्त आहे. पण, ओबीसींना मिळालेलं आरक्षण कमी आहे. २७ टक्क्यांच्यावर ओबीसींना आरक्षण नाही. ओबीसी आरक्षणात वाढ करून त्यात अ,ब,क,ड असे वर्ग करा. मराठा समाजाला ओबीसीमधून थेट आरक्षण नाही म्हणणं, हे चुकीचं आहे. मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहे? पाकिस्तान की अमेरिकेतील आहेत का? मराठ्यांना आरक्षणाचा अधिकार नाही का? मराठ्यांचं मागासलेपण सरकारला माहिती नाही. मग, मराठ्यांना आरक्षण का नाकारता?” असा प्रश्न बच्चू कडूंनी सरकारला विचारला आहे.
महाराष्ट्रात वाढत चाललेला भेदभाव चुकीचा आहे. राज्यात सगळीकडे मराठा-कुणबी आहेत. फक्त मराठवाड्यात ‘मराठा’ लिहिल्यानं चालत नाही. संत तुकाराम महाराजांनी स्वत: सांगितलं की, ‘बरे झाले देवा कुणबी झालो’. ते मोरे ‘मराठा’ लिहितात. इतकं स्पष्ट असताना आरक्षण नाकारणं म्हणजे जाणीवपूर्वक पळवाट काढल्यासारखं आहे. ज्यांनी मोगलांच्या तलवारी छातीवर घेतल्या. त्यांच्याच छातीवर सरकार तलवारी चालवत असेल, तर तुमची तुलना मोगलांबरोबर करण्याची वेळ येऊ नये,” असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप