आता सरकारला वेळ देणार नाही, तीव्र उपोषण करणार: मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३: आता वेळ दिला जाणार नसून टोकाचं उपोषण करण्यात येणार असल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनावर सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नासाठी आणखी थोडा वेळ द्यावा, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले, आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही. चाळीस दिवसांचा वेळ घेतलेला आहे. मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांच्या सन्मान ठेवला, एक महिन्यांपेक्षा अधिक दिवस सरकारला दिले. त्यांनी स्वतः वेळ घेतलेला आहे, त्यामुळे आता वेळ मिळू शकत नसल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.
तसेच चार दिवसांत कायदा पास होणार नसल्याचं महाजनांनी सांगितलं होतं, त्यासाठीच एक महिन्याचा वेळ मागितला, पण आम्ही चाळीस दिवसांचा वेळी दिला होता, मग आता नेमकं कशासाठी वेळ पाहिजे, समाज म्हणून आम्ही एक तासाचाही वेळ देणार नाही, आज रात्रीच आरक्षण जाहीर करावं, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गेवराईमध्ये ६४ गावांत कुणबी समाजाचे दाखले निघालेत. याआधी अशी माहिती होती की बीडमध्ये एकही कुणबी समाजाची नोंद नाही, मात्र आमच्या लोकांनी अभ्यास करून गावागावात माणसे पाठवून ही माहिती गोळा केली आहे. सरकार आम्हाला पागल समजत आहे का? आरक्षण कसे देत नाही तेच आम्ही पाहू, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटलांनी अल्टिमेटम पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीचं काम वेगाने सुरु असून ही समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आ,हे त्यामुळे मराठा आरक्षणासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असं आवाहन मनोज जरांगेंना महाजन यांनी केलं आहे.