राज्य सरकारचे कंत्राटी भरतीचे धोरण रद्द, धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरेंच्या ‘पापा’त सहभागी होणार नाही’’
मुंबई, २० ऑक्टोबर २०२३: कंत्राटी भरतीच्या निर्णयावरूनरान उठत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली.
शासनाच्या याच निर्णयाचे स्वागत करत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असून, त्यांचे पाप आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न असफल झाल्याचे, धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मात्र यातून एकप्रकारे धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पापात सहभागी होण्यास एकप्रकारे नकारच दिला असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली त्याच महाविकास आघाडी सरकारमध्ये धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री होते.
धनंजय मुंडे म्हणाले, सर्वात आधी कंत्राटी भरती प्रक्रियेचा जन्म २००३ मध्ये झाला, त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. त्यानंतर विविध विभागात कंत्राटी भरतीचे अनेक प्रयोग झाले. २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विभागात कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला व त्याची कार्यवाही सुरू केली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्हीही सत्तेत होतो, मात्र आम्ही या निर्णयाला विरोध केला होता. आज रद्द करण्यात आलेला भरती प्रक्रियेचा निर्णय हा ठाकरे यांचाच होता. या निर्णयातील कंत्राटदार नेमणे, टेंडर प्रक्रिया वगैरे सर्व काही पूर्ण होऊन तो आता समोर आला.
विरोधक त्यांचेच पाप आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यातही ते फसले, असे म्हणत सदर निर्णय रद्द केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यातील युवा वर्गाच्या वतीने आभार मानले.