‘भायखळ्याच्या दुकानात बसणारा सहा हजार कोटीचा मालक कसा झाला’ – छग भुजबळ यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांची टीका
आकोला, १९ ऑक्टोबर २०२३: मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावातल्या सभेसाठी सात कोटी रुपये कुठून आले? असा खोचक प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता.
छगन भुजबळांच्या मनोज जरांगे पाटलांवरील टीकेला प्रकाश आंबेडकरांचं उत्तर देत भायखळ्याच्या दुकानात बसणारा सहा हजार कोटीचा मालक कसा झाला? असा प्रश्न करत टीका केली.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात विराट सभा पार पडली. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज एकटवला असून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीला कडाडून विरोध केला आहे. तसेच या सभेपूर्वी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांच्या सभेच्या खर्चावरुन प्रश्न उपस्थित केले होते.
अंतरवालीतल्या सभेसाठी सात कोटी रुपये कुठून आले? असा खोचक प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. भुजबळांच्या या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. गाडीत डिझेल भरण्यासाठी एक-दोन हजार रुपये देऊ का? असा खोचक टोला जरांगे यांनी भुजबळांना लगावला.
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील सातत्याने आमने-सामने येत आहेत. दरम्यान, भुजबळांच्या जरांगे यांच्यावरील टीकेला आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. जरांगे यांच्या सभेसाठी सात कोटी रुपये कुठून आले? असा प्रश्न विचारणाऱ्या छगन भुजबळ यांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, हाच उलटा प्रश्न मी विचारला तर चालेल का?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, भायखळ्याच्या भाजी बाजारात साध्या दुकानावर बसणारा माणूस आज पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा मालक होतो. आता जर हे प्रश्न भुजबळांना विचारले तर त्यांना कसं वाटेल? मला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लोकांनी पैसे दिले. परंतु, एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना तीन बोटं आपल्याकडे आहेत हे छगन भुजबळांना माहिती नसेल, असं वाटतंय.