पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा अजित पवारांनी दिला राजीनामा; पार्थ पवारांना संधी दिली जाण्याची शक्यता

पुणे, १० आॅक्टोबर २०२३ ः गेल्या ३२ वर्षापासून पुणे जिल्हा बँकेचे संचालक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा वाढता व्याप लक्षात घेता हा राजीनामा देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी दिली आहे. दरम्यान, या जागी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या ३२ वर्षापासून अजित पवार जिल्हा बँकेचे संचालक राहिले आहेत. काही काळ ते बँकेचे अध्यक्ष देखील होते. बारामती तालुका अ वर्गातून ते निवडणूक लढवत होते. १९९१ साली ते पहिल्यांदा जिल्हा बँकेचे संचालक झाले होते. बँकेला राज्यात प्रथम आणण्यात अजित पवार यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिला असला तरी आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेऊ, असे बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बंडखोरी करत अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर त्यांनी काही आमदार, खासदार यांनासोबत घेत पक्षावर दावा केला आहे. आपणच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगात सांगितले आहे. यानंतर अजित पवार यांनी पक्ष विस्तार आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात १४ जणांचा नावांचा समावेश करण्यात आला आहेत. ईडीने २६ ऑगस्ट २०१९ रोजी पीएमएलएल कायद्यानुसार तपास सुरु केला. त्याअंतर्गत २०१० मध्ये एमएससीबीने साखर कारखान्याचा कमी दरात लिलाव केला व अपेक्षित प्रक्रियाही पार पाडली नसल्याचे ईडी तपासात आढळले होते. त्यावेळी अजित पवार एमएससीबीच्या संचालक मंडळावर होते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार हे बारामती गटातून बिनविरोध निवडून येत होते. ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात असल्याने अजित पवार यांची चलती होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे अजित पवारांवर गद्दारअसा शिक्का मारला जात आहे. असे असताना अजित पवार यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे.