“गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या औषधं घेत नाहीत”, नांदेडच्या घटनेवर चित्रा वाघ यांचं वक्तव्य
नांदेड, १० ऑक्टोबर २०२३: डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. या बालमृत्यूवरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानेही दखल घेतली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नाहीत, असा गंभीर आरोप केला. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या आरोपावरून चित्रा वाघ यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, “छोट्या बाळांना पेटीत ठेवतात. तिथे अनेक आई बसलेल्या होत्या. मी त्यांच्याशी बोलले. त्यांचा व्हिडीओ मी माध्यमांना देते. गोळ्या दिल्या जातात, पण आम्ही खात नाही. पोषण आहार दिला जातो, आम्ही कधी खातो, कधी खात नाही. डॉक्टरांनी या गोळ्या घ्यायला सांगितल्या आहेत. त्या गोळ्या घेतल्या असत्या तर मुल तंदुरुस्त असतं आणि तुमच्या मांडीवर खेळत असतं हे आम्ही त्यांना सांगितलं.”
“आपण औषधं आणि पोषण आहार पुरवू शकतो, त्यांना गिळायला देऊ शकत नाही. आशा सेविका लोह आणि इतर गोळ्या देतात. मात्र, गर्भवती माता या गोळ्या घेतात की नाही इथून आपल्याला बघण्याची गरज आहे,” असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांचे मृत्यू होत असल्याने राज्य सरकारवर टीका केली जात आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मृत्यूचे आकडे आभासी असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यावर टिकीची जोड उठलेली असताना आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महिला गोळ्या खात नाहीत म्हणून मुलांचा मृत्यू होतो असे सांगितले त्यावरून देखील पडसाद उमटले असून राज्य सरकार काम करण्याऐवजी जबाबदारी ढकलत असल्याचे टीक केली जात आहे.