राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडिया शरद पवारांचीच होती – देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ः राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतची आयडिया ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच होती, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस राजकीय स्थितीवर बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या भूमिकेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया शरद पवार यांनीच भाजपला सूचवली होती. त्यानुसार तेव्हा ती लागू करण्यात आली. त्यावेळी पवार आम्हाला म्हणाले होते की, मी एवढ्या लवकर युटर्न घेऊ शकत नाही. तुम्ही प्रथम राष्ट्रपती राजवट लागू करा. त्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेईल. त्यानंतर आपल्याकडे पुरेसे संख्याबळ झाल्यानंतर आपसूकच महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांना पत्राद्वारे तुम्ही सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहात काय, याबाबत विचारण्यात आलं होतं., त्यानंतर हे पत्र राष्ट्रवादीलाही देण्यात आलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करणार नसल्याचं मी हिलीलं ते माझ्या घरी टाईप झालं त्यानंतर पवारांनीच काही करेक्शन सांगितले होते. त्यानंतरच ते पत्र केंद्र सरकारला पाठवण्यात आलं होतं. तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शरद पवार मोठे व्यक्ती आहेत. मोठे नेते आहेत. ते नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण शिवसेनेने आमचा विश्वासघात केला त्यावेळी शरद पवारांनीच आमच्याशी आघाडी करण्याची चर्चा केली होती. त्यांचीच आमच्यासोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा होती. पण त्यानंतर जे काही घडले ते तुम्ही सर्वांनी पाहिले. हेच सत्य आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.