मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जालन्याला येऊन भेट घेणार, मनोज जरांगे म्हणाले स्वागत आहे

जालना, १३ सप्टेंबर २०२३: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात येऊन आंदोलनस्थळी भेट घ्यावी, अशी मागणी केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१३ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता मनोज जरांगेंना भेटायला जालन्याला जाणार असल्याचं वृत्त आहे. यावर मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच यानंतर उपोषण सोडणार की नाही यावरही भाष्य केलं.

मनोज जरांगे म्हणाले, “काही हरकत नाही, त्यांनी मला भेटायला यावं. मात्र, ते भेटायला येणार आहे की नाही याबाबत माझ्याकडे खात्रीलायक माहिती नाही. ते आले तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीने स्वागत आहे. आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळही दिला आहे. ते इथे आल्यावर त्यांच्याशी आम्ही मराठा आरक्षणावर पुन्हा चर्चा करूच. आमची मूळ मागणी मराठा आरक्षणाची, कुणबी प्रमाणपत्राची आहे. हीच मागणी ते भेटायला आल्यावर पुन्हा त्यांच्यासमोर करेन,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.

“ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही”
मराठा समाजाला ३० दिवसात आरक्षण मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी दिलं तर तुम्ही ही जागा सोडणार का, उपोषण सोडणार का? या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले, “नाही, ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना भेटायला वेळ हवा होता, तो वेळ मी दिला.”