“पुणे, चंद्रपुरात लोकसभेची पोट निवडणूक घ्यायची हिंमत नाहीं” – सामना मधून भाजपावर हल्लाबोल
मुंबई, ११ सप्टेंबर २०२३: जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रभावी नेते निमित्ताने भारतात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचीही चर्चा झाली. मात्र, जी-२० परिषदेच्या निमित्ताने भारताचं जागतिक पटलावर महत्त्व वाढल्याचं दिसत असलं, तरी मोदींचा व भाजपाचा देशांतर्गत राजकीय शक्तीपात झाल्याची टीका ठाकरे गटानं केली आहे. नुकत्याच झालेल्या सात विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये एनडीएला ३ तर इंडिया आघाडीला चार जागा मिळाल्या आहेत. पुणे आणि चंद्रपूर लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही असा हल्लाबोल ठाकरे गटानं पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर हल्लाबोल केला आहे.
“जागतिक महाशक्ती आपण बनतोच आहोत अशी हवा मोदी व त्यांचे प्रचारक निर्माण करीत आहेत. पण सहा राज्यांतील सात विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालाने ही ‘हवा’ काढून घेतली. जगात महाशक्ती व स्वदेशात राजकीय शक्तिपात असे चित्र आता स्पष्ट झाले. सात विधानसभा पोटनिवडणुकांत ‘इंडिया’ आघाडीस चार तर मोदीप्रणीत एनडीएला तीन जागा मिळाल्या. या तीनपैकी दोन जागा त्रिपुरा राज्यातल्या आहेत. २७ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची ही पहिली चाचणी परीक्षा होती व त्या परीक्षेत ती पास झाली आहे”, अशी टिप्पणी सामना अग्रलेखात करण्यात आली आहे.
“उत्तर प्रदेशातील घोसीच्या जागेवर सपातून भाजपात गेलेले आमदार दारासिंह चौहान यांनी राजीनामा दिला व तेथे निवडणूक झाली. घोसी जिंकण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आदित्यनाथ, त्यांचे दोन उपमुख्यमंत्री, डझनभर मंत्री, शंभरावर आमदार मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. सत्ता व पैशांचा वापर झाला. तरीही घोसीच्या मतदारांनी भाजपवासी झालेल्या दारासिंह चौहान यांचा दारुण पराभव केला. तेथे ‘सपा’चे सुधाकर सिंह यांनी मोठा विजय संपादन केला. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातील हे ‘क्लायमेट चेंज’ म्हणजे हवामान बदलाचे उदाहरण आहे. 80 जागा या एका राज्यात आहेत”, अशा शब्दांत ठाकरे गटानं उत्तर प्रदेशात बदलाचा दावा केला आहे.
“उत्तर प्रदेशात या वेळी मोठा चमत्कार घडेल असे वातावरण आहे. सपा, काँग्रेस एकत्र आहे. मायावतींचे शेवटपर्यंत तळ्यात-मळ्यात आहे. ईडी, सीबीआय चालवणारे कोणते सरकार येत आहे हा अंदाज घेऊन त्या निर्णय घेतील. पण कोणी कितीही आडमुठे धोरण स्वीकारले तरी उत्तर प्रदेशात या वेळी भाजपास मोठा फटका बसेल”, असा दावाही ठाकरे गटानं केला आहे.
“..तिथे निवडणूक घ्यायची आयोगात हिंमत नाही”
“दिल्लीत ‘जी-20’चा दरबार भरला आहे. मोदींची लोकप्रियता जागतिक पातळीवर वाढली वगैरे ठीक आहे, पण इकडे स्वदेशात त्यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली हे निवडणूक निकालाने स्पष्ट झाले. चार महिन्यांपूर्वी पुण्यातील कसब्यात भाजपचा गड ‘इंडिया’ गटाच्या काँग्रेसने जिंकला. महाराष्ट्रात पुणे, चंद्रपूर या दोन लोकसभा रिकाम्या आहेत. पण तेथे निवडणूक घेण्याची हिंमत भाजप प्रायोजित निवडणूक आयोगात नाही. कारण लोकांत पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारविरोधात संताप आहे. फसवणूक व लुच्चेगिरीची नऊ वर्षे देशाच्या नाकीनऊ आणणारी ठरली. लोक आता फसवणूक करून घ्यायला तयार नाहीत”, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.