जरांगे म्हणाले मी नतमस्तक होतो – सत्ताधारी विरोधकांना साद
जालना, ११ सप्टेंबर २०२३: आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नसून, विरोध म्हणून या बैठकीला न जाता आमचा आक्रोश घेऊन या बैठकीला जावे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास मी त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन नाक घासण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यानंतरही हे आंदोलन थांबवण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यातच आता जरांगे पाटलांनी आफला दणकाच असा आहे असे म्हणत सरकारला इशारा आणि संदेश दिला आहे.
मराठा आरक्षणावरून राज्य सरकार आणि सर्व राजकीय पक्षांना इशारा देत जरांगे म्हणाले की, आमच्याविरोधात बोलणाऱ्यांना आम्ही सोडत नाही. आपला दणकाच असा असून, सत्तेत असणाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा असे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केले आहे.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आमच्याविरोधात न बोलणाऱ्याला आम्ही विनाकारण लक्ष करत नाही. मग ती व्यक्ती कुणी का असेना. मात्र, सत्तेत असणाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा ही आमची मागणी असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज (दि. ११) मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नसून, विरोध म्हणून या बैठकीला न जाता आमचा आक्रोश घेऊन या बैठकीला जावे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास मी त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन नाक घासण्यासही मागेपुढे पाहणार नाही.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यास कमी पडल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर आता जरांगे यांनी अजितदादांना आवाहन केले आहे. आरक्षणाबाबत अजितदादांनी चार पाच पक्षांना एकत्र घेऊन हा विषय लावून धरण्याची मागणी केली आहे.