शिंदे गटातील १५ आमदार उद्धव ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक – आमदार रोहित पवार यांचा दावा
धाराशिव, १३ ऑगस्ट २०२३: अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सत्तेत सहभागी झाले. त्यांना मंत्रीपदंही मिळाली अन् खातेवाटपही झाले. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांना अद्याप मंत्रिपदे मिळालेले नाही. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळं शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनीही शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचा दावा केला आहे.
मराठवाड्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सांभाळण्याची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळं रोहित पवार हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. धाराशीव येथील त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलतांना त्यांनी शिंदे गटातील पसरलेल्या नाराजीसंदर्भात मोठा दावा केला आहे. यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, सरकारमध्ये गेलेले कधीही नाराज राहणार नाहीत, असं होणार नाही. ते नाराज राहणारच. कारण कुणाला किती काहीही दिलं तरी ते कमीच वाटतं. शिंदे गटाच पंधरा आमदार नाराज आहेत. येत्या काळात हे आमदार उध्दव ठाकरेंकडे जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासंदर्भात चर्चाही सुरू आहे. पण त्यांना उध्दव ठाकरे घेतील का हा प्रश्न आहे, असं रोहित पवार म्हणाले.
अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे. शिवाय, शिंदे गटातील मंत्रिपदावरून नाराज असल्यानं हे आमदार पुन्हा उध्दव ठाकरेंकडे जातील असं बोललं जातं आहे. गेल्या वर्षभरापासून एकमेकांवर टीका करणारे हे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनीही व्यक्त केली होती. तर संजय राऊत यांनीही शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. ते त्यांच्या व्य़था आणि वेदना आमच्यासमोर मांडत असतात. ते आमचे जुने सहकारी आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत, असं राऊत म्हणाले होते.
तर आता आमदार रोहित पवारांनीही शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचा दावा केला. त्यामुळं हे नाराज आमदार उध्दव ठाकरेंकडे जाणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.