संभाजी भिडे यांना अटक न केल्यास राज्यपालांना झेंडावंदन करू देणार नाही
पिंपरी चिंचवड, ११ ऑगस्ट २०२३. : संभाजी भिडेंना अटक न झाल्यास स्वातंत्र्यदिनी राज्यपालांना झेंडावंदन करु देणार नसल्याचा इशाराच संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला आहे. पुण्यात आज संभाजी भिडेंवर अटकेच्या कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयावर नेण्यात आला होता.
सतीश काळे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यदिनाबद्दलही अवमानकारक भाषा वापरणाऱ्या भिडेंवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिनी ध्वजवंदन करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनापर्यंत संभाजी भिडेला अटक झाली नाहीतर झेंडावंदन करु देणार नसल्याचं काळेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच स्वातंत्र्यदिनीच काळ्या फिती लावून राज्यभरात आंदोलन केलं जाणार असल्याचं काळे म्हणाले आहेत.
संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन वादंग पेटलं आहे. राज्यात ठिकठिकाणी भिडेंविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना संभाजी भिडे हजेरी लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. अमरावतीतल्या एका कार्यक्रमातही ते मार्गदर्शन करीत होते. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.
दरम्यान, भिडेंनी वादग्रस्त विधान केल्यानंतर अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता भिडेंना आठ दिवसांत हजर राहण्याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्यासह आयोजकांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे.