‘सभागृहात बसला आहात की जुगार अड्ड्यावर’ – बच्चू कडू यांची आदित्य ठाकरेंवर टीका
मुंबई, ४ ऑगस्ट २०२३: विधानभेच्या अधिवेशनात आज आमदार बच्चू कडूंचा संताप पाहायला मिळाला. प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होते. बच्चू कडू विधानसभेत बोलत असताना शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते आपसात बोलत होते. त्यांच्या गप्पांमुळे बच्चू कडू यांना बोलताना अडथळा येत होता. अखेर बच्चू कडू यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर ही नाराजी विधानसभा अध्यक्षांपुढे व्यक्त केली. तरीदेखील आमदारांमधील गप्पा सुरूच होत्या. अखेर, बच्चू कडू यांनी स्वतः या आमदारांना सुनावलं. तसेच तुम्ही सभागृहात बसलेले आहात की जुगाराच्या अड्ड्यावर गप्पा मारताय? असा प्रश्नही विचारला.
आमदार बच्चू कडू म्हणाले, अध्यक्ष महोदय यांना थांबवाना, इथे इतकी मोठी चर्चा सुरू आहे. परंतु, हे लोक आपसात बोलत बसले आहेत. ते बघा, ते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, रवींद्र वायकर आणि शिवसेनेचे लोक आपापसात चर्चा करत बसले आहेत. हे लोक सभागृहात आहेत की, सभागृहाच्या बाहेर गप्पा मारत बसलेत तेच कळत नाही. यावर तालिका अध्यक्षांनी या सर्व आमदारांना शांत राहण्यास सांगितलं. तसेच ते म्हणाले, बच्चू कडूंना बोलत असताना व्यत्यय येतोय. त्यामुळे शांत राहा. तरीदेखील हे आमदार बोलत होते.
तालिका अध्यक्षांनी बजावल्यानंतरही आमदारांच्या गप्पा सुरू होत्या. त्यामुळे बच्चू कडू अधिकच संतापले. ते म्हणाले, अध्यक्ष महोदयांनी सांगितल्यानंतरही ही हे लोक बोलत आहेत. अध्यक्ष महोदय तुमचा प्रभावच पडत नाही. यांना सांगा आपसात बोलू नका. तुम्ही काय जुगार अड्ड्यावर बसलाय का? मीसुद्धा चार वेळा आमदार म्हणून निवडून आलोय.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप