अजित पवारांची एंट्री होताच सरकारमध्ये भांडणे सुरू, अदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास विरोध
मुंबई, ६ जुलै २०२३: भाजप-शिवसेनेच्या सत्तेमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे. ही नाराजी आता थेटपणे उघडकीस येत आहे. आता स्थानिक राजकारणातील वाद उफाळून येत आहे. रायगड जिल्ह्यात असा वाद आता उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे या मंत्री झालेल्या आहेत. त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्याला आता रायगडमधील शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले व इतर आमदारांनी थेट विरोध दर्शविला आहे.
रायगडचे पालकमंत्रीपद हे शिंदे गटाला राखून ठेवण्यात आलेले आहे. भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर तेच रायगडचे पालकमंत्री असतील, असे निश्चित झालेले आहे, असे भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. शिवसेना व भाजपच्या सहाही आमदारांनी अदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध दर्शविला आहे.
याबाबत भरत गोगावले म्हणाले, भाजप व शिवसेनेच्या सहाही आमदारांनी अदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हे पद माझ्यासाठी ठेवलेले आहे. आता माझा नंबर आहे. यासाठी मी थांबलेलो आहे. रायगडचे पालकमंत्रीपद भाजपला पण देऊ नये, असे ठरलेले आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री होत्या. त्यावेळी अदिती तटकरे या शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाही. त्यांची कामे करत नाही. शिवसेनेच्या आमदारांना दाबण्याचे काम करतात, असा आरोप गोगावले यांनी केला होता. तटकरे यांना भरत गोगावले यांच्याबरोबरच आमदार महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे यांनीही जाहीरपणे विरोध दर्शविला आहे.
तीन पक्ष सत्तेत आल्याने मंत्रिमंडळ वाटप कळीचा मुद्दा ठरणार आहे. तसेच स्थानिक राजकारणामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भरत गोगावले यांनी अदिती तटकरे यांनी जाहीरपणे विरोध करणे यातून हे दिसून येत आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप