संजय राऊत म्हणाले शरद पवारांचा अजित पवारांच्या बंडाला विरोध

मुंबई, २ जुलै २०२३ : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या या निर्णयाला शरद पवार यांचा पाठिंबा आहे, की विरोध? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
त्यावर पवार यांचा विरोध आहे अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीला शरद पवार यांचा पाठिंबा नाही, असे सांगितले आहे. मी खंबीर आहे. लोक आपल्या पाठीशी आहेत, असे शरद पवार यांनी संजय राऊतांना सांगितले आहे.
अजित पवार राजभवनावर दाखल, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण

शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले ‘मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.’ होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही,” असे संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे जवळजवळ सर्वच महत्त्वाचे नेते अजित पवार यांच्यासोबत आहेत. मात्र पहिल्या फळीतील खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख आदी नेते मात्र अजित पवार यांच्या शपथविधीदरम्यान राजभवनात उपस्थित नव्हते.
दरम्यान, अजित पवार यांच्या या बंडाला शरद पवार यांचा पाठिंबा नसेल, तर आगामी काळात राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार? शरद पवार काय भूमिका घेणार? महाविकास आघाडीचे काय भवितव्य असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप