महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार? – चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर टोला
पुणे, २३/०६/२०२३: विरोधकांनी एकीची कितीही मूठ बांधली तरी त्यांना यश येणार नाही. एकवटेले विरोधक घराणेशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दिल्ली काय सांभाळणार असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.
ते पत्रकारांशी बोलत होते. पैशापासून सत्ता व सत्तेपासून पैसा मिळविणाऱ्या विरोधकांची पुढची पिढी धोक्यात आली आहे. म्हणून त्यांना वाटतं की आम्ही आज एकत्र आलो नाही, तर आमचे सर्वकाही उद्ध्वस्त होईल. आम्ही केलेले काळे धंदे हे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पुढच्या पिढ्यांची चिंता करण्याकरिता एकत्र आले आहेत. अशा बोलघेवड्या लोकांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. आता महाराष्ट्राची जनता त्यांना साथ देणार नाही, असेही श्री बावनकुळे म्हणाले.
विरोधकांनी कितीही वज्रमूठ बांधली तरीही मोदी जगातले सर्वोत्कृष्ट नेते म्हणून समोर आले आहेत. २०२४ मध्ये एनडीए ४०० हून अधिका जागांवर विजय मिळविणार ऐवढी ताकद पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तयार झाली आहे. भारतातील प्रत्येक नागरिक मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये भारत मांडला आहे आणि आजसुद्धा नरेंद्र मोदी अमेरिकेत भारताला मांडत आहेत.
• आदित्य ठाकरेंच्या तक्रारीची चौकशी व्हावी
महाराष्ट्रात सत्तेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केला. मविआ सरकारच्या काळात कोविड घोटाळ्यासह एवढे काळे धंदे केले आहेत की, तक्रारीच्या आधारे चौकशी झाली असेल. अशा भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी तक्रार केली असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे.
• राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुन्हा महानाट्य
ओबीसी नेते राष्ट्रवादी सोडून जात आहे. म्हणून त्यांच्या पक्षात ओबीसी प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी पुढे आली आहे. राष्ट्रवादी ओबीसी विरोधी आहे. त्यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात काहीही वाव नाही. त्यांच्याकडे असलेले मोठे ओबीसी नेते आता भाजपमध्ये येत आहेत.त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा महानाट्य होईल आणि त्याचा शेवट शरद पवार करतील.