मुंबईच्या कोवीड सेंटरची चौकशी करता मग ठाणे, नागपूरची का करत नाही – अंबादास दानवेंचा सवाल
मुंबईत, २१ जून २०२३: ठाकरे गटाच्या निकटवर्तियांवर आज ईडीने छापे टाकले. या प्रकारावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईत घोटाळा झाला असे ईडीला वाटत असेल तर ठाण्यात काय झाले, नागपुरात काय झाले. ईडी केवळ शिवसैनिकांवर पक्षपातीपणे कारवाई करत आहे, असा आरोप दानवे यांनी केला.
दानवे आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोवड संकटाच्या काळात ठाण्यात काय झाले हे सांगण्याची गरज नाही. आजही अनेक साहित्य खरेदी केलेले तसेच पडून आहे. किती गैरव्यवहार झाला याची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.
शिवसैनिकांवर अशा कारवाया होत असतील तर शिवसैनिकांना त्याने काहीच फरक पडत नाही. अशा कारवायांची सवय आता झाली आहे. संजय राऊत यांच्यावरही अशीच कारवाई केली होती. त्यालाही आम्ही सामोरे गेलो आहोत.
तसे पाहिले तर कोविडच्या काळातील देशपातळीवरील कारभाराची चौकशी झाली पाहिजे. त्या काळात पैसे महत्वाचे नव्हते तर जो तातडीने सेवा देईल ते जास्त महत्वाचे होते. कोविड काळात आमच्याबरोबर जे काम करत होते. त्यातील काही लोक आता शिंदे गटात गेले आहेत. मग त्यांची चौकशी का केली जात नाही, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. मुंबईपाठोपाठ ठाणे, पुणे, नागपूर या ठिकाणीही कारवाई झाली पाहिजे मात्र तसे होत नाही. दुजाभाव केला जातो, असा आरोप दानवे यांनी केला.