मुख्यमंत्री सुळे तर उपमुख्यमंत्री आदित्य…. म्हणून शिवसेना फुटली – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांचा गौप्यस्फोट

पुणे, १७ जून २०२३: शिवसेनेचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते. त्यातच 2024 नंतर सुप्रीया सुळे मुख्यमंत्री आणि अदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करायचे, असे ठरले होते. असे झाले तर मग आपण पुन्हा कसे निवडून येणार, या भितीमुळे आमदार उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर झाले आणि शिवसेना फुटली, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
टिफिन बैठकीसाठी बावनकुळे शनिवारी पुणे दौर्‍यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नव्हते, त्यांच्या खिशाला पेन सुद्धा नसायचा. परिणामी शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती. मात्र, अजित पवार सकाळी सहा पासून रात्री एक वाजेपर्यंत मंत्रालयात त्यांच्या आमदारांची कामे करायचे. राष्ट्रवादीने शंभर आमदार निवडून येण्याचे उद्दीष्ठ ठेवले होते तर शिवसेनेच्या आमदारांची कामेच होत नव्हती. पाच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री राहणार आणि 2024 नंतर सुप्रीया सुळे मुख्यमंत्री आणि अदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करायचे, असे शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले होते. याची कुणकुण शिवसेनेच्या आमदारांना लागल्याने त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले.

भाजप आणि शिवसेना एक परिवार आहे. परिवारातील दोन भावांमध्ये मतभेद होत असतात. तसे काही मतभेद झाले तर पक्षनेतृत्व, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ते मतभेद दूर करण्यास सक्षम आहेत. एखाद्या जाहीरातीमुळे भाजप शिवसेना युती तुटणार नाही. ही युती फेविकॉल ने जोडलेले आहे.

एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत. खा. श्रीकांत शिंदे चांगले काम करत आहेत. एखादी घटना युतीमध्ये दरी निर्माण करू शकत नाही. 2024 मध्ये पुन्हा राज्यात भाजप – शिवसेनेचे सरकार येईल, शिवसेनेचे आमदार निवडबन येण्यासाठी भाजप आपल्या उमेदवारांपेक्षा दहा टक्के अधिकच काम करेल. पहिल्या जाहिरातीला दुसर्‍या जाहिरातीने नष्ट केले आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे म्हणाले…..

– तपासामध्ये पुरावे नाही मिळाले तर पोलिस क्लिनचिट देतात. प्रवीण दरेकर आणि मोहित कंबोज यांना ज्या प्रकारे क्लिन चिट मिळाली आहे, तशीच क्लिन चिट अजित पवारांनाही यापूर्वी मिळाली आहे.
– अजित पवार आमचे चांगले मित्र आहेत. ते दिलदार आहेत. त्यांनी कधीही कामे करताना भेदभाव केला नाही. ते राष्ट्रवादीतच राहणार आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
– काँग्रेसला एक मत देणे किती धोकादायक ठरू शकते, हे कर्नाटकात पहायला मिळत आहे. राहुल गांधी यांचा सांगण्यावरून सावरकर धडा काढला आहे. तसेच धर्मांतर कायदा बदलला आहे. हे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?
– भाजपचा काय प्लॅन आहे हे जयंत पाटलांना कसे माहिती, ते आमच्या कोणत्या गोपनीय बैठकीला आले होते का ? शिवसेनेचे आमदार शिवसेनेच्या तिकीटावर लढतील ते भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढणार नाहीत.
– शरद पवार आणि काँग्रेसला नवीन पक्षाची भिती वाटते, म्हणून ते विविध पक्षांना भाजपची बी टीम म्हणतात.