फडणवीस म्हणाले “मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी बारामतीत अडवलं’’, अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर
मुंबई, १७ जून २०२३: मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडवलं होते. ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यानंतर करत आहे, असा दावा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका केली. यालाही विरोधीपक्ष नेते जशास तसे उत्तर देत हिशोब चुकता केली.
एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी “मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी बारामतीत अडवलं होते, ते पुन्हा मराठवाड्यापर्यंत पोहचवण्याचं काम आमचं सरकार करत आहे. आमचं सरकार असताना कृष्णा प्रकल्पाला निधी देऊन त्याच्या बोगद्याच्या कामाला सुरूवात केली. त्याला सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती. पण, अडीच वर्षे महाराष्ट्रातील सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यतेचा एक शब्दही दिला नाही,” असा आरोप केला.
अजित पवार यांनी त्यास प्रत्यत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, “बारामतीत कोणतेही पाणी अडवलं नाही. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी वस्तुस्थिती सांगावी. पाणी देत असताना विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथेच बैठका झाल्या. तेव्हा महाराष्ट्र कृष्णा विकास महामंडळच्या अधिकारात येणारं मराठवाड्याचं हक्काचं पाणी, जे उस्मानाबाद आणि बीडला मिळणार आहे, ते त्यांना मिळालं पाहिजे, असा निर्णय झाला.”
“निरेचं पाणी चंद्रभागेस न जाता इंदापूरमधील एका बोगद्याद्वारे उजनीत आलं. उजनीतून उचलून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी देण्याचा निर्णय झाला. बोगद्याचं काम होण्यास वेळ लागतो. त्यात बारामतीचा प्रश्न आला कुठे. फक्त बारामती नाव घेतलं की, त्याला वेगळं महत्व प्राप्त होते. ब्रेकिंग आणि हेडलाईन होते, म्हणून वक्तव्य केली जातात,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.