युतीतील नाराजीनाट्यावर पडदा टाकण्यासाठी हायप्रोफाईल बैठक
मुंबई, १६ जून २०२३:कल्याण डोंबिवलीच्या वादामुळे खासदार शिंदे अस्वस्थ होते. तर, मुख्यमंत्रीदेखील नाराज झाले होते. तर, दुसरीकडे ‘देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात एकनाथ’ या जाहिरातीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील नाराज असल्याची चर्चा होती. अखेर युतीमधील या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आज करण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मध्ये हाय प्रोफाईल बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खासदार श्रीकांत शिंदे प्रतिनिधीत्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात वादाची ठिणगी पडली. एक वर्षाचा कारभार सुरळीत सुरू होता. त्यानंतर या लोकसभा जागेवरून युतीत वाद सुरू झाल्याचे म्हटले जाते. भाजपने या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाविरोधात उघड भूमिका घेत कोणतेही सहकार्य करणार नसल्याचा ठराव केला. भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याविरोधात जाणीवपूर्वक विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा भाजपने केला.
कल्याणमधील या वादावर पडदा पाडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठका घेतल्या. पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पाडल्यानंतर राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक घेतली. पालघरमधील कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्यासोबत ग्रीन रुममध्ये चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या वादावर नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांनी संयमी घेत आपण एकत्र आहोत, एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. एकमेकांविरोधात वाद निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले.
जाहिरातींच्या वादावर काय?
मुख्यमंत्री मुंबईत आल्यानंतर जाहिरातींच्या विषयावर भूमिका उपमुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितली. मुख्यमंत्री शिंदे यांनीदेखील यावर सकारात्मक भूमिका घेत खासदार श्रीकांत शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलावणं धाडलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात चर्चा झाली. शिवसेनेच्या त्या जाहिरातीमध्ये शिंदे अथवा शिवसेना नेत्यांचा हात नव्हता हे स्पष्ट करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपण आपल्या सोशल मीडिया आणि इतर टीमवर नियंत्रण ठेवले पाहिजे. जेणेकरुन विरोधकांना संधी मिळणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. दोन्ही पक्षातून कोणताही नेता कोणतेही वक्तव्य करणार नाही, कोणतेही वक्तव्य करण्याआधी दोन्ही नेत्यांची मंजुरी लागेल असे ठरवण्यात आले.
दिल्लीचेही लक्ष?
राज्यात आगामी निवडणुकीच्या आधीच दोन्ही पक्षांमधील वाद पेटल्याने भाजपचे पक्ष श्रेष्ठी नाराज झाल्याची चर्चा होती. त्यानंतर हा वाद शमवण्यासाठी दिल्लीतून सूचना आल्यात भाजप नेत्यांचेही या वादावर लक्ष होते. त्यामुळे अखेर वादावर पडदा पडला असल्याचे बोलले जात आहे