पक्षाची परवानगी घेतल्यानंतरच माध्यमांशी बोला – भाजप नेत्यांच्या बोलण्यावर लगाम

मुंबई, १६ जून २०२३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आमने-सामने येताच भाजपने सावध होऊन स्वपक्षाच्या नेत्यांना आवर घालण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना माध्यमांपुढे राजकीय भाष्य करताना प्रदेश नेतृत्वाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, फलक उभारण्यावर बंधने घातली आहेत. नेत्यांच्या बोलण्याने सरकार आणि भाजप-शिवसेना युतीवर परिणाम होऊन विरोधकांच्या हाती कोलीत जाऊ नये, याकरिता भाजपने कठोर पावले उचलली आहेत.

जाहिरातीच्या मुद्यावरून भाजपच्या काही नेत्यांनी उघडपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतले. त्याला शिंदे समर्थक आमदारांनीही जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे युतीत नव्या
वादाला तोंड फुटून राजकीय परिणामांची चिंता व्यक्त केली जात आहे. अशात बावनकुळे यांनी मात्र, दोन दिवसांनंतर का होईना आपल्या पक्षाच्या नेत्यांची समजूत काढून, काळजी घेण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे राजकीय मतभेद, वादांवर भूमिका मांडताना नेत्यांना प्रदेश नेतृत्वाची म्हणजे, बावनकुळे यांचीच संमती घ्यावी लागणार असून ‘बॅनरबाजी’ वरही मर्यादा आणल्या आहेत. बावकुळे म्हणाले, “सत्ता हे भाजप आणि शिवसेनेचे प्राधान्य नसून, विकास आणि हिंदुत्वाच्या हेतूने युती केली आहे. ती टिकलीच पाहिजे. त्यामुळे जाहिराती, फोटो, फलक आदींना महत्त्व नाही. त्यामुळे कोणीही काही बोलू नये, वादग्रस्त फलक लावू नये, राजकीय वाद ओढवून न घेण्याच्या सूचना पदाधिकारी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.”
जागावाटपाचा निर्णय पक्षाचे केंद्रीय निर्णय घेते, असे सांगून बावनकुळे यांनी जागावाटपाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. युती टिकविणे महत्त्वाचे जाहिरातीवरून शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केलेल्या भाजप नेत्यांचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रशेखर बावनकुळे यांनी कान टोचले.

काही अतिउत्साही कार्यकर्ते काही गोष्टी करतात, असे सांगून, यापुढे कुठेही काहीही न बोलण्याची तंबीच बावनकुळे यांनी आपल्या नेत्यांना दिली. जाहिराती, बॅनर लावू नयेत. आरोप-प्रत्यारोप करू नयेत. सध्याच्या स्थितीत युती टिकविणे महत्त्वाचे असल्याचेही बावनकुळे अधोरेखित केले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रगल्भ नेते असल्याने त्यांच्यात मतभेद नसल्याचेही बावनकुळे यांनी या वेळी सांगितले.