राज्यातील दंगलींचा एकच पॅटर्न : जयंत पाटील
सांगली, १४ जून २०२३ : “राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत. त्या एकाच पॅटर्ननुसार होत आहेत,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. “पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सलोखा बिघडवून दंगली होत आहेत. खरं तर या दंगली घडविल्या जात आहेत, अशी शंका आहे. राज्यात घडणाऱ्या दंगली एकाच पॅटर्ननुसार होत आहेत. ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडविल्या जात आहेत. कोल्हापूर, नाशिक, नगर येथील दंगली पाहिल्यानंतर त्याबद्दल शंका येऊ लागते. गृहमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवावी. आम्ही विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला तयार आहोत.”
जिथे विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडवल्या जात आहेत. विरोधकांची ताकद दाबण्याचा हा प्रयत्न आहे काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत पाटील यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे त्यावर नियंत्रण मिळवावे अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे
‘मविआ’ पुढे टिकाव लागणार नाही शिवसेनेने केलेल्या जाहिरातीवरून जयंत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व्हे केला आहे. शिंदे यांना लोकांचा चांगला पाठिंबा आहे, तर भाजपने याचा विचार
करावा; पण महाविकास आघाडीपुढे यांचा टिकाव लागणार नाही.”
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप