भारतातील डिजिटल सेवांनी जी-२० बैठकीसाठी आलेले प्रतिनिधी प्रभावित
पुणे, 13 जून 2023: जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आयोजित प्रदर्शनाला बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी भेट देऊन विविध दालनांची माहिती घेतली. भारतातील डिजीटल सेवांबाबत विशेष रुची दाखवताना डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन पाहून परदेशी प्रतिनिधी प्रभावित झाले.
भारतातील डिजीटल प्रगतीसंदर्भात यावेळी सदस्यांनी माहिती घेतली आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात विशेष रुची दाखवली. जागतिक पातळीवर तांत्रिकदृष्ट्या मागे असलेल्या देशांना भारताने नेहमीच सहकार्य केले असल्यामुळे येणाऱ्या काळात भारताकडून प्रगत डिजिटल तंत्रज्ञान मिळण्याची अपेक्षा आहे. भारतात डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधांविषयी (डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर- डीपीआय) अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनात आधार, युपीआय प्रणाली, डिजीलॉकर, उमंग उपयोजक, शैक्षणिक उपयोगी दीक्षा उपयोजक व संकेतस्थळ, भाषिनी उपयोजक व संकेतस्थळ, ई-संजीवनी राष्ट्रीय टेलीमेडीसीन प्रणाली, सहकारी कृषी पणन बाजारपेठ जोडणीचा ई-नाम प्रकल्प आणि सॉईल हेल्थ कार्ड, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी), डीजीटल प्लॅटफॉर्मबाबत माहितीपूर्ण दालनांतून या प्रकल्पांची माहिती प्रतिनिधींनी उत्सुकतेने घेतली.
आधार, भाषिणी ॲपबाबत विशेष रुची
रुग्णांना दूरध्वनीवर किंवा ऑनलाईन वैद्यकीय सल्ला देण्यासंदर्भातील ई-संजीवनी योजनेबाबत माहिती देणाऱ्या दालनाला सुरीनाम आणि सिएरा लिओनच्या प्रतिनिधींनी भेट दिली. ऑनलाईन पद्धतीने या सेवेचा लाभ घेण्याबाबतची प्रक्रीया त्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जाणून घेतली. युपीआय व आधार ओळख प्रणालीच्या उपक्रमाची माहिती प्रतिनिधींनी बारकाईने जाणून घेतली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी माहिती दिली. भारतातील ‘भाषिणी’ ॲप हे अत्यंत नाविन्यपूर्ण असून सर्वांसाठी सहज उपलब्ध असा हा शब्दकोष असल्याची प्रतिक्रिया सुरीनामच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
पुणे स्मार्ट सीटी आणि महानगरपालिका उपक्रमांना मोठा प्रतिसाद
पुणे स्मार्ट सिटी आणि पुणे महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी माहिती तंत्रज्ञानावर आधारित विविध उपयोजक, संकेतस्थळ आणि ऑनलाईन सुविधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींसमोर याचे सादरीकरण करण्यात आले. टांझानिया, केनिया, सिएरा लिओन व अन्य देशांच्या प्रतिनिधींनी औत्सुक्याने या प्रकल्पांची माहिती घेतली आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे कौतुक केले. त्यांच्या देशातही नागरिकांसाठी सुविधा देणारे माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मनोदय व्यक्त केला असे पुणे महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांनी सांगितले.
पुणे शहर व राज्याच्या इतर भागातील नागरिकांनीदेखील प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. विशेषत: उमंग आणि भाषिणी ॲपचे भेट देणाऱ्यांना विशेष आकर्षण होते.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप