फडणवीस यांचा आणखी एक पीए आमदार होण्याच्या मार्गावर
मुंबई, ८ जून २०२३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) राजकारणात प्रवेश करत आहेत. फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या सुमीत वानखेडे यांच्यावर खाद्यांवर वर्धा लोकसभेचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या अभिमन्यू पवार आणि विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या श्रीकांत भारतीय यांचे राजकीय प्रवेश झाले आहेत.
भाजपने आज (8 जून) राज्यातील 48 मतदारसंघासाठी प्रभारी जाहीर केले. याशिवाय 288 विधानसभा मतदारसंघासाठीही प्रभारी जाहीर केले. यातच वर्धा लोकसभा मतदारसंघात प्रभारी म्हणून वानखेडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. वानखेडे यांच्या रुपाने फडणवीस यांनी त्यांच्या आणखी एका निकटवर्तीयाला राजकीय मैदानात उतरवलं आहे.
मागील काही दिवसांपासून सुमित वानखेडे यांच्या नावाची भावी आमदार म्हणून चर्चा सुरु आहे. याच कारण म्हणजे त्यांचे मागील काही दिवसांपासून वाढलेले वर्धा आणि आर्वीचे दौरे. वास्तविक सुमित वानखेडे मूळचे आर्वीकर तर त्यांची सासुरवाडी वर्धेची. पण जनतेच्या समस्या ऐकण्यात त्यांचा सर्वाधिक वेळ जातो. फडणवीस मुख्यमंत्री असताना तर वानखेडेंनी कोट्यवधी रुपयांच्या विकासयोजना आर्वी मतदारसंघात खेचून आणल्या होत्या.
कारंजा नगरपालिकेत भाजप सत्तेत नाही, मात्र तरीही भाजपच्या नगरसेवकांना मोठा निधी मिळतो. याचेही उत्तर वानखेडे यांच्याच जवळ येऊन थांबते. त्यामुळे त्यांच्या नावाची भावी आमदार म्हणून चर्चा सुरु होते. पण सगळ्या चर्चांवर ते म्हणतात, की मी या भागात आलो की लोकं भेटायला येतात. मी कार्यक्रमास आलो पाहिजे असे त्यांना वाटतं.
मात्र आर्वी मतदारसंघातून वानखेडे यांच्या भावी आमदारांच्या चर्चांमुळे तेथील भाजप आमदार दादाराव केचे नाराज झाले आहेत. त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पण आता राजकीय बॉसला खुश करुन वानखेडे आर्वीतून तिकीट मिळविण्यात यशस्वी होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप