कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण ;हिंदुतववादी संघटनांचा हिंसक मोर्चा

कोल्हापूर, ७ जून २०२३ : व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील व्यवहार पूर्णतः बंद होते. तर संबंधित तरुणांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनाने शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याला हिंसक वळण लागले आहे.
दरम्यान याप्रकरणावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून पडद्यामागे जे कोणी असतील त्यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. तर खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करत औरंगजेबाची वृत्तीकरण करणाऱ्या प्रवृत्तीला चाप घाला पुन्हा असे धाडस झाले नाही पाहिजे अशी टीका केली आहे.

कोल्हापुरात हिंसाचार सुरू झाल्यानंतर दोन ते तीन वेळा मी कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखांसोबत संपर्कात आहे. जमावाला शांततेच्या मार्गाने पांगवण्याचं आमचं पहिलं प्राधान्य आहे. काही प्रमाणात जमावाकडून गाड्यांची मोडतोड झाली, त्यामुळे जमावाला सौम्य पद्धतीने पांगवण्याचं काम पोलिसांकडून झालं”, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

“जमाव प्रक्षुब्ध का झाला यावर सर्वांत आधी विचार केला पाहिजे. एकाएकी जमाव प्रक्षुब्ध होत नाही. औरंगजेबाचे फोटो डोक्यावर घेऊन काही लोकांनी संभाजीनगरमध्ये मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र आहे. क्रुरकर्मा औरंगजेबाने चाळीस दिवस अतोनात छळ करत संभाजी महाराजांचा वध केला. अशा औरंगजेबाचे फोटो घेऊन कोणी नाचत असेल तर जमाव प्रक्षुब्ध होतो”, असं शंभूराज देसाई म्हणाले.
“त्यामुळे याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. हे करणारे कोण आहेत? डोक्यावर फोटो घेऊन नाचवणारे पडद्यामागे कोण आहेत? याचा शोध घेतला पाहिजे. आज मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोस्ट करणारे, फोटो डोक्यावर घेऊन नाचवणारे आणि त्यांच्या मागे जे कोणी आहेत त्यांची सायबर सेलमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करणार आहे. वेळप्रसंगी राज्याच्या गुप्तचर खात्याकडून त्यांची चौकशी झाली पाहिजे. गेले ११ महिने महाराष्ट्रात शांततेचं वातावरण आहे, विकासाची कामे सुरू आहेत. त्याला खिळ बसवण्यासाठी, गालबोट लावण्यासाठी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात कोणी करतंय का याच्या खोलवर जाणं गरजेचं आहे”, असंही शंभूराज देसाई म्हणाले.

कोल्हापूरच्या या प्रकरणावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविलेला आहे आणि कारवाईची मांडणी देखील केलेली आहे. शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे. असे छत्रपती संभाजी यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप