“हे छोटे मंत्रिमंडळ योग्य वाटत असावे” – अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांना टोला
पुणे, ५ जून २०२३: मंत्रीमंडळाचा विस्तार करायचा की नाही, कधी करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. कदाचित वीस जणांचे छोटे मंत्रीमंडळ त्यांना पुरेसे वाटत असेल, आणि महिलांना मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व न देणे त्यांना योग्य वाटत असावे, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी राज्य सरकारला लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षणावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती, त्याबाबत पवार म्हणाले, ओबीसींना आरक्षण मिळावे,यासाठी महाविकास आघाडीनेच प्रयत्न केेले. मध्य प्रदेशने केलेल्या तरतुदींचा अभ्यास केला. बांठिया आयोग नेमला. त्यांच्या अहवालाला अनुसरून भूमिका मांडली. आमच्यावर आरोप करताना तुमचे सरकार आल्यानंतर अकरा महिन्यात तुम्ही काय केले, हे स्पष्ट करावे.
मंगळवारी पुण्यात जालना, शिरूर आणि भिवंडी मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल आज येऊ न शकल्याने विदर्भातील जागांचा आढावा आता १४ जून रोजी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
शिंदे-फडणवीस यांच्या सातत्याने मुंबई दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. त्याविषयी विचारले असता, कोणी कुठल्याही वाऱ्या करो, आम्हाला त्याचे काही देणे घेणे नाही. आम्हाला ज्ञानोबा-तुकोबांची वारी महत्त्वाची आहे, असा टोलाही अजित पवार यांनी शिंदे फडणवीस यांना लगावला.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप