मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला पुण्यातही रिकाम्या खुर्च्या, एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटलांवर नाराज

पुणे, ४ जून २०२३: शिवसेनेमधून फुटून भाजप सोबत युती करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र मध्ये वारंवार भर सभेमध्ये रिकाम्या खुर्च्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी होत नसल्याने शिंदे गटावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जात नाही. तसाच अनुभव आज त्यांना पुण्यामध्ये देखील आला. महाराष्ट्रातील विकास कामांचे उद्घाटन करताना आयोजित केलेल्या कार्यक्रमास एक हजार लोकही उपस्थित नव्हते. त्यामुळे आयोजकांना रिकाम्या असलेल्या खुर्च्या उचलण्याची वेळ आली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे “दादा कार्यक्रम ऑनलाईन ठेवला असता तरी चाललं असतं” अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (महारेल) वतीने राज्यातील विविध ठिकाणच्या ९ उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि ११ पुलांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज हस्ते झाले. मात्र, ठरलेल्या वेळेपेक्षा हा कार्यक्रम तब्बल सव्वातास उशीर झाला. कारण, मुख्यमंत्री शिंदे यांच्या या कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरवली होती.

पुण्यातील शिवाजी नगर येथील उड्डाणपुलाचा भूमिपूजन कार्यक्रम चार वाजता होणार होता. मात्र कार्यक्रमासाठी अपेक्षित गर्दी नसल्याने कार्यक्रम उशिराने सुरू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस मैदानावर नऊ उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळा पार पडला. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरीही ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमस्थळी भव्य मंडप बांधण्यात आला होता. एक हजार नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र दुपारी 3.30 च्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू झाला. त्यामुळे शहरातील नागरिकांनी कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. त्यामुळे प्रक्षिक्षणार्थ महिला पोलिस कर्मचाऱ्यांना कार्यक्रमस्थळी बोलवण्याची वेळ आयोजकांवर आली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाडीतून खाली उतरताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांना कार्यक्रमाची माहिती देत ​​होते. कार्यक्रम ऑनलाइन असता तर बरं झालं असतं, असं त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितली.

या कार्यक्रमाला नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सभागृहाच्या मागील बाजूच्या जागा रिकाम्या होत्या. त्यामुळे आयोजकांवर खुर्च्या उचलून ठेवायची वेळ आली होती. अखेर हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी या नऊ उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि ११ पुलांचे उद्घाटन केले. या उड्डाणपुलांमुळे सातारा, कोल्हापूर, हिंगोली येथील रेल्वे वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत होणार आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप