कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातही ४० टक्के पैटर्न – सतेज पाटील
कोल्हापूर, २९ मे २०२३: कोल्हापुरातील रस्त्यांसाठी आम्ही शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता. तो रद्द करून बाकडी, ओपन जिम करिता वळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. यामधून कर्नाटक राज्यातील ४० टक्के कमिशनचा पॅटर्न कोल्हापुरात येऊ पाहत आहे, अशी टीका माजी गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
कोल्हापूर महापालिका अंतर्गत न्यू शाहूपुरी भागात एक कोटीच्या निधीतून रस्ते कामाचा शुभारंभ केल्यानंतर प्रारंभ जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील बोलत होते. आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले.महापालिकेत नगरसेवक नसल्याने गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. देशात इतरत्र सर्व निवडणूक होत असताना राज्यात महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका घेण्यास राज्य सरकार घाबरत आहे, अशी टीकाही सतेज पाटील यांनी केली.
एप्रिल महिन्यापर्यंत आम्ही सत्तेत असताना फलंदाजी करीत होतो. तेव्हा कोल्हापूरच्या विकासासाठी मोठा निधी आणला. आता आम्हाला क्षेत्ररक्षण करावे लागत आहे. आम्ही आणलेल्या निधीतही सत्ताधारी आडकाठी घालण्याचे धोरण अवलंबून असून ते लोकशाहीसाठी घातक आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.