सापनाथ नागनाथ एकत्र आले तरी मोदीना पराभूत करू शकणार नाहीत – देवेंद्र फडणवीस

मुंबई, २४ मे २०२३: लोकशाही वाचविण्याच्या नावाखाली भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील सापनाथ-नागनाथ सगळे एकत्र येत आहेत. तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका. हा केवळ एक शब्दप्रयोग आहे. पण कितीही सापनाथ नागनाथ एकत्र आले तरी ते मोदीजींना पराभूत करू शकणार नाहीत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे केजरीवाल भेटीवर टीका केली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यापाठोपाठ आज (२४ मे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. केजरीवाल उद्या शरद पवारांना भेटतील. भाजपाविरोधात विरोधक एकत्र येत आहेत. याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारल्यवर देवेंद्र फडणवीस म्हणाले सापनाथ-नागनाथ एकत्र येत आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे लोक लोकशाही वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत. परंतु हे लोक मुळात लोकशाही मानणारे नाहीत. लोकशाहीच्या गोष्टी करून हे लोक स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाही वाचवणं हा त्यांचा अजेंडा नसून केवळ नरेंद्र मोदींना पराभूत करणं हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सापनाथ-नागनाथ सगळे एकत्र येत आहेत. तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका. हा केवळ एक शब्दप्रयोग आहे. कितीही सापनाथ नागनाथ एकत्र आले तरी ते मोदीजींना पराभूत करू शकणार नाहीत. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी संसदेच्या एनएक्स इमारतीचं उद्घाटन केलं होतं. ते लोकशाहीविरोधी होतं का? राजीव गांधी यांनी संसदेच्या ग्रंथालयाचं भूमिपूजन केलं होतं, मग ते लोकशाहीविरोधी होतं का? मग नरेंद्र मोदी उद्घाटन करत असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय?

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप