लोकसभा होऊद्या मग २०२४ नंतर कोणाला इडीच्या कार्यालयात पाठवायचे आम्ही ठरवू – संजय राऊत यांचा भाजपला इशारा
मुंबई, २३ मे २०२३: अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चौकशी करणार आहे. जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा सूचक दिला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. मात्र, हे चित्र फार काळ टिकणार नाही. 2024 मध्ये ईडी कार्यालयात कोणाला आणि किती दिवसांसाठी पाठवायचे याची यादी आम्ही लवकरच तयार करू, असा इशाराच आता राऊत यांनी दिला.
आज मुंबईमध्ये माध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले की, की, केंद्रीय यंत्रणा सूडाच्या भावनेने सर्वांची चौकशी करत आहेत. आम्ही या सगळ्याचा सामना केला आहे, यापुढेही जावे लागू शकते. जयंत पाटील हे एक खंबीर नेते आहेत. या दबावापुढे ते झुकणार नाहीत. जयंत पाटील आज ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. तुम्ही काहीही चूक केली नाही. हे राजकीय दबावाचे षडयंत्र आहे. जेव्हा आम्ही काही गोष्टी करत नाही तेव्हा गुडघे टेकण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केले जातात. मात्र, आम्ही आमच्या गुडघे टेकणाऱ्यातले नाही, असं राऊत म्हणाले.
काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली होती. जयंत पाटलांना आयएल अँड एफएस प्रकरणात ईडीकडून ही नोटीस देण्यात आली होती. आज पाटील यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. दरम्यान, ईडीच्या नोटीशी विषयी बोलतांना पाटील यांनी सांगितले की, मी कायद्याचे पालन करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे ईडी जे प्रश्न विचारेल त्याची उत्तरे मी कायद्यानुसार देईन.आयएल आणि एफएलएस प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप