जयंत पाटील यांची इडीची चौकशी, राष्ट्रवादीचे आंदोलन
मुंबई, २३, मे २०२३ ः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत. आज यांची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी सुरू झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी या ईडी चौकशी विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले.
दरम्यान, जयंत पाटील यांनी या चौकशीला जाण्याअगोदर ट्विट करत माहिती दिली होती. ‘आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.’असे ट्विटमध्ये नमूद केले आहे.
त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन देखील केलं आहे. ते म्हणाले, ‘माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशी कामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.’असं पाटील म्हणाले.
आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.
सत्तासंघर्षाच्या निकालाच्या दिवशी आली पहिली नोटीस…
सर्वांत पहिल्यांदा जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली ती ११ मे ला, याच दिवशी सर्वोच्च न्यालायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. शिंदे सरकारला या निकालामध्ये दिलासा मिळाला. तर हा निकाल येण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली. त्यामुळे हा निकाल आणि पाटील यांना आलेली ही नोटीस हा योगयोग नसून जाणूनबुजून केलं असल्याच्या चर्चा देखील झाल्या.
त्यानंतर चौकशीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी जयंत पाटील यांनी ईडीकडे केली. त्यांच्या घरी असलेल्या काही वैयक्तिक कार्यक्रमांमुळे त्यांनी ही वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर लगेचच त्यांना जयंत पाटलांना पुन्हा एकदा ईडीची नोटीस आली. ज्यामध्ये त्यांना आज सोमवारी २२ मे ला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले.
जयंत पाटील यांची ईडीने चौकशी केली ते प्रकरण नेमकं काय?
इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांची चौकशी होत आहे. आयएल आणि एफएलएस ही एक फायनान्स कंपनी आहे. ही कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकाआणि विमा कंपन्यांनी तयार केली आहे. गेल्या काही काळापूर्वी या कंपनीच्या व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याने तिची चौकशी सुरू झाली होती. या कंपनीने मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. याच दरम्यान २०१९ मध्ये या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. तर पोलिसांनी या कंपनीवर मनी लॉंड्रींगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये अरुणकुमार साहा यांची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये नंतर अनेक नावं समोर आली त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखल समावेश होता. तर याच आयएल आणि एफएलएसने एका कंपनीला कर्ज दिलं होतं. या कंपनीचं कनेक्शन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी असल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे आता या चौकशीतून नेमकं काय समोर येणार. खरचं जयंत पाटील दोषी ठरणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. तर या प्रकरणावर स्वतः जयंत पाटील म्हणाले की, ‘मी ज्या पद्धतीने राज्यात वावरतो बोलतो याची पूर्ण जाणीव जनतेला आहे. जनतेला कोणत्या प्रकारचे लोक काय करू शकतात याची कल्पना आहे. त्यामुळे मला चिंता वाटत नाही.’
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप