कर्नाटकातील कॉंग्रेसचा विजय हा ‘डुबते को तिनके का सहारा’ – देवेंद्र फडणवीस

पुणे, १६ मे २०२३ : कर्नाटकातील कॉंग्रेसचा विजय हा ‘डुबते को तिनके का सहारा’ असा आहे.  महाराष्ट्रात त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही कारण महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. पुण्यामध्ये भाजपचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे ‘ऑक्टोबर, नोव्हेंबर’ मध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर जेंव्हा केंव्हा महापालिका निवडणुका होतील, त्यावेळी भाजपचाच महापौर होईल. भाजप- शिवसेनेचीच सत्ता येईल. परंतू यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घर चलो अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने केलेल्या जनहिताच्या कामांची माहिती घरोघरी पोहोचवून मतदारांमध्ये जागृती निर्माण करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

       भाजपचे शहरअध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या तीन वर्षाच्या कार्यअहवालाचे प्रकाशन, घर चलो आणि समर्थ भारत अभियानाचा प्रारंभ येरवडा येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, ओबीसी सेल प्रदेशअध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह शहरातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

       फडणवीस म्हणाले, कोरोनानंतर संपुर्ण जगात मंदी आली. शेजारच्या पाकिस्तानची परिस्थिती पाहातो. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण अगदी नागरिकांच्या छोट्या गोष्टींचा विचार करून नियोजन केले. लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे अर्थ व्यवस्था सुरळीत राहीली. आजमितीला जगात आपली अर्थव्यवस्था सर्वात वेगाने पुढे जात आहे. मागील ९ वर्षात आपला देश जगात स्वंयपुर्णतेच्या दिशेने वेगाने पुढे जातोय.
२०१७ ते २०१९ पर्यंत आपण महापालिकेत केलेली कामे आपल्या सरकारच्या काळात केली. चोवीस तास पाणी पुरवठा योजना असो, मेट्रो, उड्डाणपुलाची कामे असो ही आपण केली. परंतू २०१९ नंतर महावसुली सरकारने अनेक कामांना ब्रेक लावला. आपले सरकार आल्याबरोबर आपण कोट्यवधींचा नदी सुधारचा काम हाती घेतले आहे. अनेक वर्षांचा ४० टक्के कर सवलतीचा निर्णय अवघ्या १५ मिनिटांत घेतला.

    गिरीष बापट, मुक्ता टिळकांची पोकळी आम्हाला जाणवेल, परंतू कार्यकर्त्यांची फळी संघर्ष करणारी आहे. पुणे हा भाजपचा गड आहे. आपण सरकारच्या माध्यमांतून सर्व समाज घटकांसाठी विविध योजना राबवतोय. कर्नाटक मध्ये अपेक्षित यश मिळाले नाही, हे खरे आहे. परंतू २०१८ मध्ये ३६ टक्के मत मिळवून १०६ जागा मिळविल्या. यंदा फक्त पॉईंट चार टक्के मते कमी मिळाली आणि ४० जागा कमी झाल्या. कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुक होईल तेंव्हा तेथिल २८ पैकी २५ जागा जिंकू असा विश्‍वास आहे. मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्‍वास आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था बेगानी शादीमें, दुसर्‍याच्या घरात मूल जन्मले हे झेंडे घेउन नाचताहेत. महाराष्ट्रात त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रातील जनता मोदींच्या पाठीशी आहे. ही लढाई जिंकायची असेल तर घर चलो अभियानाअंतर्गत प्रत्येक घरी जावून भाजपचे काम सांगायचे आहे. पहिली लढाई ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होईल असे वाटते, परंतू कोर्टाचा निकाल काय होईल, माहित नाही. मात्र महापालिकेत भाजपचाच महापौर होईल, असा विश्‍वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकार घालवण्यासाठी मला घरी बसावे लागले असते तरी चालले असते परंतू पक्षाने मला उपमुख्यमंत्री पद देउन सन्मानच केला – फडणवीस
२०१९ मध्ये राज्यातील जनतेने भाजप- शिवसेना युतीला सत्ता दिली. परंतू उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी विचार सोडत दोन्ही कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यात महावसुली सरकार आले. दोन मंत्री जेलमध्ये गेले, अनेक अधिकारी जेलमध्ये गेले. मला अतिशय आनंद होतोय,  बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असलेले एकनाथ शिंदे आपल्यासोबत आले. हे सरकार घालवण्यासाठी मला घरी जरी बसावे लागले असते तरी चालले असते. परंतू पक्षाने मला उपमुख्यमंत्री पद देउन सन्मानित केले. आपण स्थगिती सरकार घालवून गतिमान सरकार आणले आहे, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.