भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायच्यात – अजित पवार यांचा दावा

मुंबई, १५ मे २०२३: शिंदे-फडणवीस सरकारने विचार केल्यास सहा महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीवेळीच घेतील, असं भाकीत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.

आगामी निवडणुकांबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारच्या मनातलं सांगितलं आहे. आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

अजित पवार म्हणाले, 1999 साली राज्यात नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांचं सरकार होतं. त्यावेळी त्यांनी सहा महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीदरम्यानच घेतल्या होत्या. त्यामुळे सरकारने विचार केल्यास निवडणुका सोबत घेऊ शकत, अशी शक्यता अजित पवारांनी व्यक्त केलीय.
कर्नाटक निकालानंतर अनेकांच्या तोंडून लोकसभेच्या निवडणुकीदरम्यानच विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचं सुतोवाच ऐकायला मिळत आहे. कारण आता तीन राज्यांच्या लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यांच्या समावेश आहे. त्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे. त्यामुळेच माझ्या मते सरकार असा विचार करु शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यामुळेच अचानक निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तीनही पक्षांची धावपळ व्हायला नको म्हणून आजची बैठक पार पडलीय. या बैठकीत याच निवडणुकीसंदर्भात चर्चा झालीयं. त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटासह जे मित्र पक्ष आहेत, त्यांनाही सोबत घेतलं पाहिजेत, यावरही चर्चा झाली असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची राज्यात होणाऱ्या वज्रमूठ सभेत मित्र पक्षांचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, सभेदरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनाच भाषणे करण्याची संधी मिळाली. यापुढील सभेत मित्र पक्षांच्या नेत्यांनाही संधी मिळण्यात यावी, याबाबतही चर्चा झाली आहे.