मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम जगजाहीर – उद्धव ठाकरे यांचे शरद पवारांना उत्तर

मुंबई, ४ मे २०२३: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी दोन वर्ष काय काम केले हे जगाजाहीर आहे. या कामामुळेच मी राज्यातील जनतेला त्यांच्या घरातील सदस्य असल्या सारखे वाटू लागले होते. पवारांना त्यांचे आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकारआहे, पण माझे काम जगजाहीर आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना उत्तर दिले.

शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (ता. २) झाले. पवारांनी त्यांच्या पुस्तकात महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वेळाच मंत्रालयात आले, ही बाब पचनी पडले नाही.
असे सांगत उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. पवार म्हणतात, “शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकारणात सत्ता टिकविण्यासाठी वेळप्रसंगी वेगाने हलचाली कराव्या लागतात. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात संघर्ष करायला हवा होता. त्यांनी मात्र माघार घेतली. दरम्यान, कोरोना काळात सर्व नेते फिरून काम करीत होते तर मुख्यमंत्री या नात्याने ठाकरे ऑनलाइन माध्यमातून सर्वांशी संपर्कात होते. तसेच मुख्यमंत्री असूनही ते फक्त दोन वेळा मंत्रालयात आले, ही बाब पचनी पडली नाही.”

शरद पवारांच्या या मतावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. ठाकरे म्हणाले,”प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर आहे. माझ्या कामामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येकाल मी कुटुंबातील एक सदस्य वाटतो. मी कसे काम केले हे मला माहिती आहे. त्यावर जास्त बोलणार नाही.”

दरम्यान, पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पवार अध्यक्षपदावरून पायउतार झाले तर महाविकास आघाडीवर परिणाम होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष बदलामुळे महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्व पक्षांना त्यांचे अंतर्गत व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतो. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अध्यक्ष बदलासाठी चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर त्यांना संपर्क केला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाविकास आघाडीला तडा जाईल अशी कुठलीही गोष्ट घडेल असे वाटत नाही. तसेच आम्हीही महाविकास आघाडीला धक्का बसेल असे कुठलेही काम करणार नाही. आम्ही कुठल्याही एका व्यक्तीला नाही तर वृत्तीला पराभूत करण्यासाठी एकत्र आलो आहे.”

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप