हरल्यावर मिशा काढू म्हणणाऱ्यांसाठी इकडून न्हावी पाठवू का? संजय राऊतांचा संतोष बांगरांवर निशाणा
मुंबई, २ मे २०२३ : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये १७ पैकी १७ जागा आमच्याच पॅनलच्या निवडून येणार असून, तसे न झाल्यास माझी मिशी काढून देतो, असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलं होतं. मात्र १७ पैकी फक्त ५ जागांवर बांगर यांना विजय मिळवता आला आहे. त्यामुळे यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे. हरल्यावर मिशा काढू म्हणणाऱ्यांसाठी इकडून न्हावी पाठवू का? असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.
संतोष बांगर यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बांगर यांच्यामुळे प्रतिष्ठेची बनली होती. त्यातच १७ पैकी १७जागा आपल्याच ताब्यात येणार असल्याचा दावा बांगर यांनी केल्याने या निवडणुकीला अधिकच महत्व प्राप्त झाले होते. दरम्यान सोमवारी (१ मे) रोजी निकाल जाहीर झाला आणि कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांच्या पॅनलला १७ पैकी फक्त ५ जागांवर विजय मिळवता आला. तर महविकास आघाडीने १२ जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे बांगर यांनी मिशा काढण्याचा केलेल्या वक्तव्याचं व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर विरोधकांकडून देखील यावरून टीका केली जात आहे. तर बांगर आता आपल्या मिशा काढतील का? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल भाजप आणि सरकारच्या पूर्णपणे विरोधात आहे. काही भाग वगळला तर शिवसेनेसह (ठाकरे गट) महाविकास आघाडीला मोठ्याप्रमाणावर यश मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मतदारसंघातून जिथे शेतकरी मतदान करतो त्याठिकाणी म्हणजेच बाजार समितीत शिवसेना आतापर्यंत कधी लढत नव्हती. पण तिथे शिवसेनेचे (ठाकरे गट) पॅनल मोठमोठ्या ताकदीने निवडून आले आहेत. काही गद्दार आमदारांनी घोषणा केल्या होत्या की, आम्ही हरलो तर मिशा काढून टाकू, त्यामुळे आता मिशा काढल्या आहेत का पाहा. नाहीतर आम्ही येथून न्हावी पाठवतो तुमची हजामत करायला, अशा शब्दांत राऊत यांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप