संजय राऊतांनी केली भीमा पाटस कारखान्याची सीबीआयकडे तक्रार, फडणवीसांनी लक्ष न दिल्याने उचलले पुढचे पाऊल

मुंबई, २५ एप्रिल २०२३ : आमदार राहुल कुल यांच्या भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी आता थेट सीबीआयचे दरवाजे ठोठावले असून रीतसर तक्रार केली आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली असून त्यासंदर्भातली काही कागदपत्रंही ट्वीट केली आहेत. त्यामुळे राहुल कुल यांची आता सीबीआयकडून चौकशी होणार का? यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना आणि भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार केल्याचंही राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. आता त्यावरून त्यांनी फडणवीसांना लक्ष्य करतानाच सीबीआयकडे तक्रार दाखल केल्याचं जाहीर केलं.

मी दोन वेळा या प्रकरणाचे डिटेल देवेंद्र फडणवीसांकडे पाठवले. त्यांच्या कार्यालयाची पोचपावती माझ्याकडे आहे. मी भेटीची वेळ मागितली, पण त्यांनी मला अद्याप वेळ दिलेली नाही”, असं संजय राऊत यावर माध्यमांशी बोलताना म्हणले. “मधल्या काळात फडणवीस म्हणाले की मी गृहमंत्री झाल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांची अडचण होतेय. माझ्या आशा पल्लवित झाल्या. मी त्यांच्याकडे पुन्हा हे प्रकरण पाठवलं. तेव्हाही त्यावर काही कारवाई झाली नाही. तेव्हा मला लक्षात आलं की फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे त्यांच्या पक्षात असणऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण मिळालं. ५०० कोटींचा अर्थिक घोटाळा पुराव्यांसकट मी दिला असूनही विरोधी पक्षातले नेते निवडून निवडून तुरुंगात टाकले जात आहेत”, असंही संजय राऊत माध्यमांना म्हणाले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप