मी भाजपचा खासदार होतो ते लोक कसे आहेत मला माहितीये – नाना पटोले यांची भाजपवर टीका

अकोला, १८ एप्रिल २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी होणार यावरून चर्चेला उधाण आलेले असताना महाविकास आघाडी मधील धाकधूक वाढलेली होती. अखेर अजित पवार यांनी ते कोठेही जाणार नाहीत असे स्पष्ट केल्यानंतर मात्र महाविकास आघाडी नेते बिनधास्त झाले. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपने दुसऱ्याचे घर फोडून स्वतःचे घर सजवूनये अशी टीका केली.

नाना पटोले हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पटोले म्हणाले, मी भाजपची खासदारकी सोडून आलो आहे. ते लोक कसे आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. भाजप हा लोकशाही विरोधातील पक्ष आहे. भाजपने दुसऱ्यांची घरे फोडून आपले घर सजवू नये, सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असल्याचं ते म्हणाले आहेत.

काँग्रेस कधीच दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे डोकावून पाहण्याच काम कधी करत नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भाजपनेही दुसऱ्यांची घर फोडून स्वतःचे घर सजवू नये, असं ते म्हणाले आहेत.

भाजपबद्दल नागरिकांमध्ये पूर्वीसारखी सहानुभूती राहिलेली नाही. अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या उमेदवारास पदवीधरांनी पराभूत केले. त्यामुळे भाजपबद्दल नागरिकांमध्ये रोष वाढत असल्याचे दिसून येत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीकास्त्र सोडले आहे. अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून नुकसान भरपाई मिळत नाही. बेरोजगारीमुळे तरुण हैराण असल्याचं ते म्हणालेत. हे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेस प्राधान्याने काम करीत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे सत्ताधारी दुसऱ्यांच्या घरात डोकाव, त्याच्या घरात डोकाव, मग घरे फोडा, दुसऱ्या पक्षांचे लोक तोडा, यातच गुंतली असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप