भाजप उधारीवरील नेत्यांवर चालणाका पक्ष – शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका

मुंबई, १९ एप्रिल २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातून भाजपवर कडाडून टीका करण्यात आलेली आहे. भाजपकडे स्वतःचे काहीच नाही दुसऱ्या पक्षातील नेते फोडून उधारीवर हा पक्ष चालवला जात आहे. धमक्या व दबाव टाकून, कारवाईची भीती दाखवून, कधी शिवसेना, कधी राष्ट्रवादी काँग्रेस, कधी काँग्रेस मधील नेते फोडले जात आहेत असा घाणाघात अग्रलेखातून करण्यात आलेला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काल उधाण आले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी, “या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, अशी स्पष्टोक्ती दिली. दरम्यान, यावरून आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपावर टीकास्र सोडलं आहे. अजित पवारांविरोधात वावड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपानेच केलंय, असं ते म्हणाले. ठाकरे गटाने मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून ही टीका करण्यात आली

भाजपाकडे स्वतःचं असं काहीही नाही. दुसऱ्या पक्षांतले लोक उधार घेऊन ते स्वतःचा पक्ष चालवत आहेत. कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वतःचे घर भरतात. काँग्रेसवरही त्यांची वाईट नजर आहेच. धमक्या, दबाव आणि तपास यंत्रणांची सुरामारी यामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्य संपवून टाकलं. अजित पवारांच्या बाबतीत वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपानेच केले. महाराष्ट्राला अस्थिर, बदनाम व गोंधळ निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. बरे झाले, अजित पवार यांनीच हे कारस्थान उधळून लावले. त्यामुळे तूर्तास तरी या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे”, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
“अजित पवार हे मंगळवारी सकाळी विधान भवनातील त्यांच्या कार्यालयात गेले व तेथे त्यांना त्यांच्या पक्षाचे आमदार भेटायला आले. यात नवल ते काय? अजित पवार हे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत व पक्षाचे बरेचसे काम तेच पाहतात. त्यामुळे वावड्या उठवणाऱ्यांनी राजकीय भान ठेवायला हवे”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार यांच्यावरही खोचक शब्दांत टीका केली आहे. “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे एक गंमतीशीर गृहस्थ आहेत व त्यांच्या विधानांकडे निव्वळ गंमत म्हणूनच पाहावे लागेल. आता बातमी आली की, महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या भाजपा नेत्यांना दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने बोलावले. आता हे महत्त्वाचे नेते कोण, तर बावनकुळे व आशीष शेलार. म्हणजे अजित पवारांसारखा बलदंड नेता ४० आमदारांसह भाजपात प्रवेश करतोय आणि त्याबाबत चर्चा करायला कोण दिल्लीत जात आहेत, तर हे दोन ‘वेलदोडे’. तेव्हा कोणत्या वावड्या किती गांभीर्याने घ्यायच्या? याचा विचार करायला हवा”, असं ते म्हणाले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप