राजकीय स्वार्था शिवाय महाराष्ट्र भूषणचा कार्यक्रम आयोजित केला होता का ? राज ठाकरे यांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल
मुबंई, १७ एप्रिल २०२३ ः रविवारी संध्याकाळपासूनच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा चर्चेत आला आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर पुरस्काराचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे. एकीकडे विरोधक या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे सरकारवर टीका करत असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आधी ट्वीट करून आणि नंतर प्रत्यक्ष माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा कार्यक्रम राज भवनात देखील आयोजित करता आला असता पण राजकीय स्वार्था शिवाय इतके लोक बोलविले जातात का ? असा प्रश्न करत शिंदे फडणवीस सरकारवर राज ठाकरे यांनी टीका केली.
राज ठाकरेंनी आज सकाळी “या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी”, असं राज ठाकरेंनीअसे ट्वीट केले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे त्रास झाल्यानंतर उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासनावर टीका केली. “राज्य सरकारला हा प्रसंग टाळता आला असता. हा कार्यक्रम सकाळी करण्याची गरज नव्हती. उन्हामुळे वातावरण तापलेलं होतं. अशावेळी इतक्या लोकांना इतक्या सकाळी कशाला बोलवायचं? त्यांना राजभवनावर बोलवून कार्यक्रम करता आला असता. झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. “कसं कुणाला जबाबदार धरावं काही कळत नाही. कार्यक्रम संध्याकाळी केला असता तर हा प्रसंग टाळता आला असता”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, आयोजक, सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून विरोधकांकडून केली जात असताना त्यावरही राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. “ही कुणीही जाणूनबुजून केलेली गोष्ट नसते. पण इतक्या लोकांना बोलवण्यापेक्षा राजभवनावर पुरस्कार दिला गेला असता तर हा प्रसंगच उद्भवला नसता. यावेळी कार्यक्रमाचं आयोजन आणि इतक्या लोकांच्या उपस्थितीचं नियोजन करणं या सगळ्याच्या पाठिमागे राजकीय स्वार्थ होता का? या प्रश्नावर राज ठाकरेंनी होकारार्थी उत्तर दिलं आहे. “राजकीय स्वार्थाशिवाय एवढे लोक बोलवले जातात का?” असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला आहे.