पुणे महापालिकेच्या जागेत उभारले अनधिकृत होर्डींग, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
पुणे, १६ एप्रिल २०२३ : वानवडी सर्वे नंबर ६४ या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या खेळाचे मैदानात व इतर आरक्षणाच्या जागेत दहशत निर्माण करुन २० दिवसात १५ होर्डींग उभे केले आहेत. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करून त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनामध्ये माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, नंदा लोणकर, माजी नगरसेवक अशोक कांबळे, प्रफुल्ल जांभुळकर, केविन मॅन्युअल, प्रीती चड्डा, मृणालिनी वाणी, संदीप जगताप, स्वाती चिटणीस, गणेश नायडू यासह वानवडी परिसरातील सोसायटीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
वानवडी सर्वे नंबर ६४ येथे खेळाचे मैदान, पार्किंग, ए – रिंग रोड अशा विविध बाबींकरिता आरक्षण आहे. या आरक्षणाच्या जागेमध्ये मागील २०दिवसात तब्बल १५ होर्डिंग्स अनाधिकृतपणे उभी केलेली आहेत. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून,धमक्या देऊन अशाप्रकारे हे होर्डिंग उभे केलेले आहेत. याबाबत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, ही कारवाई करावी याकरिता तसेच मार्केट यार्ड परिसरातील विविध बिल्डरचा राडारोडा या ठिकाणी टाकून पुराची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या विरोधामध्ये आज जनआंदोलन करण्यात आले, हे जनआंदोलन करण्यात येत असताना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये कारवाई केली नाही तर त्यांना थेट न्यायालयात खेचण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनासंदर्भात निवेदन स्वीकारण्याकरिता वानवडी रामटेकडी, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्याम तारू हे उपस्थित होते.