राहुल गांधींना विरोध करणाऱ्यांचे पाय तोडणार – अंबादास दानवेंचा बावनकुळेंना इशारा

नागपूर, १५ एप्रिल २०२३ः कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर गांधी-ठाकरेंची ही भेट फार महत्वाची मानली जात आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना आव्हान दिलं.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची राहुल गांधी यांनी माफी मागितली तरच त्यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार, अन्यथा त्यांना पाय ठेऊ देणार नाही, असं बावनकुळेंनी सांगितलं होतं. त्याला आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींना विरोध करणाऱ्यांचा पाय शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा दानवेंनी दिला आहे.

यावेळी बोलतांना दावने म्हणाले की, पहिली गोष्ट तर कुणाला महाराष्ट्रात येऊ देणार नाही, ह्या रिकाम्या गोष्टी भाजपच्या लोकांनी करू नाही. भारतात कोणीही कुठंही जाऊ शकतं. राहुल गांधी हे काश्मिरला जाऊन आले, श्रीनगरला जाऊन आले. महाराष्ट्र हा काही पाकीस्तान थोडी आहे की, इथं जाऊ नाही. महाराष्ट्र हा देखील देशाच्या भूमीचा एक भाग आहे आणि तिथं कोणीही जाऊ शकतं. त्यामुळ राहुल गांधींना थांबवण्याची भाषा कोणी करू नये. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी, अन् ज्या गावच्या बाभळी, अन त्याच गावच्या बोरी. त्यामुळं याला पाय ठेऊ देणार नाही, त्याला पाय ठेऊ देणार नाही, हे भाजपच्या लोकांनी बोलू नाही. जो म्हणतो, राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, त्यांचाच पाय आम्ही शिल्लक ठेवणार नाही, असा सज्जड दम दानवेंनी दिला.

दरम्यान, यावेळी बोलतांना दावनेंनी सांगितले की, भाजपने विरोधकांची धास्ती घेतलेली आहे. या महाराष्ट्राची गद्दारी करून राज्यात जे खोक्यांचं सरकार आलं आहे, त्यांनी तर आमची शंभर टक्केच धास्ती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरची सभा अतिशय विराट झालेली आहे. त्यामुळे आता आमच्या ज्या सभा आहेत, त्यासाठी महाविकास आघाडीतील प्रत्येकाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक सभा ही विक्रमी होण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूरची सभाही भव्यदिव्य होणार आहे. काही लोक सांगत आहेत की, भाजपचा नागपूर हा बालेकिल्ला आहे. पण, नागपूर हा भाजपचा किल्ला नाही. कुठलेही शहर कोणाच गड नसतो. नागपूरमध्ये आतापर्यंत कायम कॉंग्रेसचाच खासदार राहिला आहे. आता ह्या एक-दोन टर्म पासून गडकरी यांच्यामुळं भाजपची इथं सत्ता आहे. भाजपमुळं नाही गडकरींची जागा निवडून आली. जर महाविकास आघाडी इथं एकत्रितपणे लढली तर नागपूरचं काय, सगळं महाविकास आघाडी साफ करेल. सभा होण्यापूर्वी भाजपच्या पोटात गोळा आहे, असं दानवे म्हणाले.

राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधान करून भाजपला डिवचलं होतं. त्यानंतर भाजपने सावरकर गौरव यात्रा काढली होती. उद्धव ठाकरेंनी देखील सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. त्यामुळं सावरकरांविषयी महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं स्पष्ट झालं होतं. या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजप राहुल गांधींना महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात आहे. बावनकुळे यांनी सांगितलं होतं की, राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी वीर सावरकर यांची माफी मागावी, मगच राज्यात पाय ठेवावा. नाहीतर त्यांना पाय ठेऊ देणार नाही,असं ते म्हणाले होते. यावर आता राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, त्याचा पाय आम्ही शिल्लक ठेवणार नाही, असा सज्जड दम दानवेंनी दिला. त्यामुळं भाजप दानवेंच्या विधानावर काय प्रतिक्रिया देते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप