फडणवीसांच्या विरोधामुळे डॉ. अजित नवले यांना शेतकरी मोर्चाच्या समितीतून वगळलं ?

मुंबई, १८ मार्च २०२३: तीन-चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान केलं. त्यातच पिकांना चांगले भाव नाहीत. या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आपल्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लॉंग मार्च विधानमंडळवार धडकला होता. या किसान मोर्चाला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लाँगमार्चमधील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक समिती नेमली होती. मात्र, या समितीतून किसान सभेचे प्रमुख डॉ. अजित नवले यांना वगळण्यात आलं आहे.

लाँगमार्च मधील मान्य मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनविली जावी, अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत दिनांक १७ मार्च २०२३ रोजी झालेल्या बैठकीत केली होती. किसान सभेच्या वतीने कॉम्रेड जे.पी. गावीत व आ. विनोद निकोले हे समितीत असावेत, असं गावीत यांनी सुचवलं होतं. मात्र आपल्याला मतदारसंघातील कामांमुळे या समितीसाठी पुरेसा वेळ देता येणार नसल्याचं सांगत त्यांनी शेतकरी नेते आणि शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक असलेले डॉ. अजित नवले यांना समितीत घ्यावे, अशा सूचना निकोले यांनी केली होती.

आ. विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे व कॉम्रेड जे.पी.गावीत यांनी लगेचच नवले यांचे नाव या समितीमध्ये असावे असे मुख्य सचिव यांना एकमताने व तत्काळ सांगितले होते. मात्र, मान्य केलेल्या मागण्यांचे इतिवृत्त योग्यप्रकारे तयार व्हावे यासाठी कॉम्रेड गावीत यांनी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली तेव्हा समितीत नवले यांचे नाव नसल्याचे निदर्शनास आलं. डॉ. नवले हे शेतकरी प्रश्नांचा अभ्यास असलेले नेते आहेत. त्यामुळे या समितीत नवले यांचा समावेश करावा, असा आग्रह समितीतील अनेकांचा आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने नवले यांच्या नावाला नासपंती दर्शवत त्यांना या समितीतून वगळून टाकलं. दरम्यान, असं का झालं? असा प्रश्न निकोले, गावीत यांनी उपस्थित केला असता त्यांना सुसंगत उत्तर मिळाले नाही.

वन जमिनीच्या प्रश्ना बरोबरच, कांदा, दूध, सोयाबीन, कापूस, हरभरा, हिरडा पिकांचे घसरत असलेले भाव, मिल्कोमीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली लूट, कर्जमाफी, देवस्थान व गायरान जमीन, पीक विमा, पीक नुकसान भरपाई, पुनर्वसन, यासारख्या प्रश्नांवर बाजू मांडण्यासाठी डॉ. अजित नवले समितीत हवेत अशी किसान सभेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

मागील लॉंगमार्चमधील शिष्टमंडळातही नवले यांना वगळण्याचा प्रयत्न झाला. नवले यांच्या नावाला फडणवीस यांनी विरोध केला होता. २०१७ मध्ये जो शेतकरी संप झाला होता. त्या संपाच्या वेळी देखील नवले यांनी शेतकरऱ्यांच्या मागण्या सरकारपुढे रेटून धरल्या होत्या. त्या संपात फूट पाडण्याचे सरकारचे प्रयत्न नवले यांनी यशस्वी होऊ दिले नव्हते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघेपर्यंत ते मागे हटत नाहीत, आणि मुद्दा सोडत नाहीत, यामुळे कदाचित फडणवीस यांना समितीत नवले नको असावेत, असं दिसतं.

दरम्यान, मी समितीत नसलो तरी विनोद निकोले हे समितीत उत्तम काम करतील. ते सरकारला पुरून उरतील आणि शेतकऱ्यांच्या मागण्या धसास लावतील असा विश्वास डॉ. नवले यांनी व्यक्त केला आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप