शेतकऱ्यांचा मोर्चाची माघार नाही, एकाच ठिकाणी तळ ठोकणार; मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर निर्णय
मुंबई, १६ मार्च २०२३ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी नाशिक ते मुंबई असा मोर्चा निघालेले असताना हे लाल वादळ आता मुंबईच्या जवळ येऊन थडकले आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या, पण या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत असे समोर आल्याने हे आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकरी, कष्टकऱ्यांच्या १४ मागण्या मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो मोर्चा विधान भवनाच्या दिशेला निघाला होता तो मोर्चा आता वाशिममध्ये काही दिवसांपूरता मुक्काम ठोकणार आहे. किसान सभेच्या शिष्ठमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे किसान सभा उद्या मोर्चा मागे घेणार असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली. पण किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आपण मोर्चा मागे घेणार नसून वाशिम येथे थांबून मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी वाट पाहणार असल्याचं सांगितलं. तसेच अंमलबजावणी होत नसल्याचं लक्षात आल्यास पुन्हा मोर्चा मुंबईच्या दिशेला यायला निघेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते जे. पी. गावित यांनी दिला.
“आमच्या मागण्यांवर बरीच चर्चा झाली. आमच्या मागण्यांवर चर्चा होऊन निर्णय झाले आहेत. मागच्या दोन मोर्चांचा अनुभव घेता जे आश्वासन दिलं जातं ते पाळलं जात नाही किंवा प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात नाही. आमच्या १८ मागण्या या विचाराधीन आहेत. केंद्राच्या मागण्या चर्चेत आहेत. पण महाराष्ट्र सरकारच्या पातळीवरच्या मागणींवर सकारात्मक चर्चा झालीय. आमचा लाँग मार्च मागण्यांवर अंमलबजावणी झाल्याशिवाय पुढे चालत राहणार, असा निश्चय घेऊन आम्ही आलो आहोत”, अशी प्रतिक्रिया जे. पी. गावित यांनी दिली.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप