टीईटी घोटाळा : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे?
नागपूर, ८ आॅगस्ट २०२२: शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हिना कैसार अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन्ही मुलींची नावे आहेत. अब्दुल सत्तार यांनी याबाबत एक चित्रफीत जाहीर करून हा नाहक बदनाम करण्याचा प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली.
आरोग्य सेवक भरती प्रकरणचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू असतानाच दुसरीकडे टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. मात्र यामध्ये आता आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे टीईटी घोटाळ्यात राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचे उघड झाले आहे.
गैरव्यवहार प्रकरणातील विद्यार्थ्यांची यादी जाहीर
परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल ७ हजार ८७४ विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेकडून गैरव्यवहार प्रकरणात विद्यार्थ्यांच्या नावाची जी यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या परीक्षार्थींची नावे आहेत.